नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी धरणावर फिरायला गेलेल्या सहा मित्रांपैकी एका युवकाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास इलेक्ट्रीक झोन परिसरातील सहा मित्र तीन मोटरसायकलवर फिरायला गेले होते. त्यावेळी धरणात अंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. पोहता येत नसताना सुद्धा ते सहा युवक धरणाच्या पाण्यात उतरले.
दरम्यान इंदर मोहन जगदीप कश्यप हा आंघोळ करता करता अचानक खोल पाण्यात गेल्यामुळे तो धरणात बुडायला लागल्याचे इतर मित्रांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी इंदरला दुपट्टे टाकून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणालाच पोहता येत नसल्यामुळे इंदरचा धरणात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच हिंगणा पोलिसांनी युवकाचा शोध सुरू केला. बऱ्याच प्रयत्नानंतर इंदरचा मृतदेह पोलिसांना मिळाला असून तो उत्तरीय तपासणी करीता पाठवण्यात आला आहे. इंदर हा कार्तिक नगर येथील रहिवासी आहे