नागपूर - ओळखीतील एका तरुणाने वेळोवेळी केलेल्या बलात्कारामुळे गर्भधारणा झाली. त्यानंतर ती तरुणी घरीच घसरून पडल्याने गर्भपात झाला, ज्यामध्ये त्या तरुणीचे बाळ मृत झाले. त्यानंतर त्या तरुणीने चक्क युट्यूबवरील व्हिडिओ बघून मृत झालेल्या बाळाची नाळ कापून बाळाला वेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना नागपूर शहरातील यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. तरुणीची प्रकृती खराब झाल्याने ही घटना उघडकीस आली. पीडित तरुणीच्या आई - वडिलांना या संदर्भात माहिती समजताच त्यांनी आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा - विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी; विदर्भाचा विश्वासघात केल्याचा आरोप
आरोपी सोहेल वहाब खान आणि पीडित तरुणीमध्ये गेल्या सहा वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. या दरम्यान आरोपीने पीडित तरुणीचे अनेक वेळा लैंगिक शोषण केले, त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. या संदर्भात पीडित तरुणीने आरोपी सोहेल याला सांगितले असता त्याने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पीडितेला गर्भपात करण्याचा सल्ला दिला.
दवाखान्यात जाऊन गर्भपात केल्यास कुटुंबीयांना याची माहिती कळेल या भीतीने पीडित तरुणी चिंतीत असताना अचानक ती पाय घसरून खाली कोसळली, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. बाळ बाहेर आल्यानंतर काय करावे या विवंचनेत असताना पीडित तरुणीने प्रियकराच्या सल्ल्याने युट्यूबवर व्हिडिओ बघून नाळ कापली आणि बाळाला स्वतः पासून वेगळे केले. त्यानंतर देखील सर्वकाही सुरळीत सुरू असताना पीडितेची प्रकृती बिघडली असताना तिच्या आई वडिलांना या संपूर्ण प्रकाराची माहिती समजली. त्यांनी लगेचच यशोधर नगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी सोहेल वहाब खान विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सोहेल आधीच विवाहित असून त्याला एक अपत्यही आहे, मात्र त्याने पीडितेला खोटी आश्वासने देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या घटनेनंतर यशोधरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
भ्रूण केले दफन -
पीडित तरुणीने युट्यूबवरील व्हिडिओ बघून बाळाची नाळ वेगळी केल्यानंतर त्या भ्रूणचे काय करावे, हा प्रश्न दोघांसमोर निर्माण झाला होता. आरोपी सोहेल याने ते भ्रूण चक्क स्मशानभूमीत दफन केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक केली.
हेही वाचा - यंदाचा 'जिजामाता विद्वत गौरव' पुरस्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जाहीर