नागपूर - मला महाराष्ट्राचा ब्राह्मण मुख्यमंत्री बघायचा आहे, असे वक्तव्य केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केले ( Raosaheb Danve On Brahmin CM ) होते. यावर प्रत्युत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 'मुख्यमंत्री हा जातीपातीचा नसून, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणारा असावा', असे म्हणत 'लोकांनी विष पेरू नये', असा टोला दानवेंना ( Vijay Wadettiwar Criticized Raosaheb Danve ) लगावला. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
फडणवीसांनीही चांगले काम केले : मुख्यमंत्री यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असावी. ही गुणवत्ता असली पाहिजे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, असे म्हणत मनोहर जोशी, देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री बघताना जात- पात, धर्माची भावना नसावी. यात जाती -धर्मात विष पेरण्याचे काम करू नये, अशा शब्दात रावसाहेब दानवे याचे नाव न घेता प्रतिउत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनीही चांगले काम केले, असे म्हणत टोला लगावला.
पावसाळ्यात निवडणूका होऊ शकणार नाही असे चित्र आहे : ओबीसींच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यावर मुख्यमंत्री यांची बैठक झाली. पण अद्याप पुनर्विचार याचिका टाकण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. न्यायालयाच्या निर्णयावर मत मतांतरांवर चर्चा झाली. यात निवडणूक प्रक्रिया सुरू करायला, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदसाठी नोटिफिकेशन निघाले नाही. त्यामुळे या परिस्थितीत सर्व प्रक्रिया पूर्ण करायला किमान एक दीड महिना लागेल. तोपर्यंत पावसाळा सुरू होतो. त्यामुळे पावसाळ्यात निवडणुका घेता येत नाही. पूर, पाऊस, यासह अनेक अडचणी असतात. त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत निवडणुका होणार नाही, असे चित्र आहे. पण यावर राज्य निवडणूक आयोग कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे निर्णय घेईल. शिवाय मध्यप्रदेशच्या याचिकेवरही निर्णय येईल. त्यानंतर महाराष्ट्र सरकार भूमिका घेईल. हा निर्णय घेताना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर ठेवून हा ओबीसीचा आरक्षणाचा विषय समोर घेऊन जाऊ असेही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यावेळी म्हणालेत.
विरोधकांच्या तोंडावर झाकण नाही : भाजपकडून सरकारवर टीका होत आहे. याला उत्तर देताना वडडेट्टीवार म्हणालेत की, विरोधकांच्या तोंडाला झाकण नाही, त्यांना केवळ आरोप करायचे म्हणून करतात. यात विरोधीपक्षाला सोबत घेऊनच कायदा केला. पण तो विषय बाजूला राहिला असून, यात पिटिशनकर्ते गवळी यांचा मागे कोण आहे? ते लोक सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, अशी टीका भाजपचे नाव न घेता केली. नागपूरपासून मुंबईपर्यंत ओरडणारे गवळीच्या मागे आहेत, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. आरक्षण भाजपने नाहीतर काँग्रेसच्या काळात दिले आहे. आरक्षण टिकावे यासाठी सर्वांनी भूमिका घ्यावी, आम्हीही घेत आहोत, असे वडेट्टीवार यांनी विरोधकांना सुनावले.
महाराष्ट्रात कोरोनाच्या मृत्यूचे आकडे लपवले नाही : डब्ल्युएचओचा अहवाल आला असून, यात भारतात दाखलेल्या मृत्यूपेक्षा चार पट अधिक मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. यावर बोलतांना मंत्री वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवार टीका केली. उत्तरप्रदेशमध्ये तरंगताना दिसलेले मृत्यूदेह त्याचे साक्षीदार आहे. महाराष्ट्राने कोरोना मृत्यूचा आकडा लपवला नाही. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आकड्यात आणि मदत मागण्याऱ्या मृत कुटुंबियांच्या आकड्यात इतर राज्यांच्या तुलनेत तफावत नाही, असेही म्हणालेत. जर इतक्या लोकांचा जीव गेला असेल आणि डब्ल्यूएचओचा अहवाल आहे तर याला जवाबदार कोण आहे, हे ठरले पाहिजे असेही वडेट्टीवार म्हणालेत.