नागपूर - शहरातील लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या वकील अंकिता शाह यांना पोलिसांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सहा महिने आधीची म्हणजे २५ मार्च रोजी घडली होती. याचे सीसीटीव्ही फुटेज शाह यांनी माहितीच्या अधिकारात मिळवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित
अॅड. अंकिता शाह हे २५ मार्चला करण नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार देण्यासाठी लकडगंज पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत त्यांच्या सोबत वाद घातला आणि त्यांना धक्काबुक्कीही केली. एवढेच नाही तर, त्यांना बळजबरीने त्यांना ओढत पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. त्या वेळी अंकिता यांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.
तक्रारकर्त्या अंकिता शाह यांनी पोलिसांकडे घडलेल्या प्रकारचे सीसीटीव्ही मागितले होते. मात्र पोलिसांनी फुटेज देण्यासही नकार दिला. यानंतर अॅड. अंकिता यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागितले. माहितीच्या अधिकारातच पोलिसांच्या विरोधात अपील करून त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज आता मिळवले आहे. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. यातून पोलिसांनी अंकिता शाह यांना दिलेली अपमानास्पद वागणूक स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडीओ मिळाल्यानंतर आता शाह यांनी या प्रकाराची पोलीस आयुक्तांसह गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली आहे.
हेही वाचा - ..असे बेजबाबदार गृहमंत्री आम्ही आयुष्यात पाहिलेले नाहीत - अतुल भातखळकर