नागपूर - २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याच्या मागणीवरून नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. मात्र, पोलिसांनी या आंदोलकांना आंदोलन सुरू होण्याच्या काही वेळातच अटक केली. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना आलेले वाढीव वीज बिल रद्द करण्याची मागणीही यावेळी विदर्भवादी आंदोलकांकडून करण्यात आली.
लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीज बिलावरून नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. कोरोना ही नैसर्गिक महामारी असताना, अशावेळी सर्वसामान्य नागरिक घरीच असल्याने कोणत्याही प्रकारचे रोजगार नसताना सरकारकडून मात्र वाढीव वीज बिल पाठवण्यात आले आहे. हे वीज बिल सर्वसामान्य नागरिक भरणार कसे? त्यामुळे शासनाने व खास करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी हे वीज बिल माफ करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करत विदर्भ राज्यात हे दर कमी करून हे वाढीव वीज बिल शासनाने भरावे, जर शासनाने हे केले नाही तर यापुढे आम्ही वीज बिल भरणार नाही, त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणीही या आंदोलनाचे प्रमुख राम नवले यांनी केली.
या आंदोलनात महिलांचा समावेश अधिक पाहायला मिळाला. यावेळी महिलांनी वीज बिल हातात घेऊन ते ऊर्जामंत्र्यांना देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या आंदोलना दरम्यान पोलिसांचा बंदोबस्त अधिक असल्याने या आंदोलकांना ऊर्जामंत्र्यांच्या घरापर्यंत पोहचता आले नाही. अशातच हे आंदोलन पोलिसांकडून काही वेळातच चिरडत कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे शासन व पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे, या आंदोलना दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही पाहायला मिळाले. या आंदोलनाचे प्रमुख राम नवले यांना पोलिसांनी ताब्यात घेताच आंदोलकही काही वेळात शांत झाल्याचे दिसून आले.