नागपूर - गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. या भीषण गर्मीत उष्णतेचे चटके असह्य होत असताना सर्वसामान्य जनता महागाईच्या भडक्याने होरपळून निघत आहेत. त्यातच आता लिंबू नंतर भाजीचे दर सुद्धा कडाडले असल्याने सामन्यांच्या खिशावर ताण वाढला आहे.
भाज्यांची आवक कमी - प्रत्येकाच्या घरात चवीने खाल्ले जाणारे वांगे भलतेच भाव खात आहेत. त्याचबरोबर शिमला मिर्ची, कोथिंबीर, फुल कोबी आणि पत्ता कोबीला सुद्धा महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे आता नागरिकांना नाईलाजाने आपला मोर्चा कडधान्यांकडे वळवावा लागला आहे. प्रत्येक उन्हाळ्यात भाज्यांची आवक कमी होते. त्यामुळे भाजीपाला महाग होत असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम हा प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर झालेला आहे. खाद्य तेलाचे दर सुद्धा दोनशेच्या दिशेने प्रवास करत असल्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाक खोलीचे बजेट कोलमडून पडले आहेत. त्यातच आता भाजा सुद्धा महाग झाल्याने ताटातल्या जेवणाची चवचं बिघडली आहे.
असे आहेत भाज्यांचे दर (घाऊक बाजार, दर प्रति किलो) - घराघरात लोकप्रिय असलेले वांग्याचे दर प्रतिकिलो दहा रुपायांवरून थेट 25 ते 30 रुपयांपर्यंत गेलेले आहेत. पालकचे दर सुद्धा दुप्पट झाले असून 30 रुपये प्रतिकिलो या दराने मिळणारी पालक आता 50 रुपये प्रति किलो झाली आहे. सिमला मिरची तर 30 वरून 50 रुपये किलोच्या दराने मिळत आहे. फणसाला सुद्धा महागाईचा तडका बसला आहे, फणसचे दर 60 वरून 100 रुपयांवर पोहचले आहेत. ढेमस 60 रुपये, गवार 50 रुपये, चवळी शेंगा 50 रुपये, हिरवी मिरची 80 रुपये, कोशिंबीर 70 रुपये, फुलकोबी 60 रुपये,कोहळे 30 रुपये, दोडके 40 रुपये किलोच्या दराने मिळत आहेत. एकूणच मार्च महिन्यात याच भाज्यांचा दर हा निम्म्याने कमी होता.
आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले - मार्च महिन्यापासूनच भाज्यांची आवक कमी होऊ लागली होती.नागपूरला शेजारच्या ग्रामीण भागातून भाजीची आवक होत आहे. मात्र मागणी वाढली आणि आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले असल्याचं मत भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केलं आहे. पुढील महिनाभर तरी भाज्यांचे दर असेच स्थित राहतील अशी असं देखील व्यापारी म्हणाले आहेत.
किचनचं बजेट कोलमडले - गेल्या महिन्यात चार सदस्यीय कुटुंबासाठी सुमारे 400 रुपयांचा भाजीपाला लागायचा. मात्र भाज्यांचे दर कडाडले आहेत. त्यामुळे आता 700 रुपये देखील अपुरे पडत असल्याची भावना नागपूरच्या अनेक गृहिणींनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबूचे दर गगनाला जाऊन भिडले होते. एका लिंबूसाठी 10 ते 15 रुपये मोजावे लागत आहेत. अजूनही लिंबाचे दर कमी न झाल्यामुळे कच्चा आंब्याची मागणी वाढली आहे.