नागपूर - नागपूर शहरात १६ जानेवारी रोजी होणाऱ्या कोविड लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रासाठी २२ हजार लस पोहोचल्या आहेत. यामध्ये नोंदणी झालेल्या साडेबावीस हजार आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १० हजार कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची सुरुवात ५ केंद्रावरून शनिवारी सकाळी करण्यात येणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स आणि मनपाचे पाचपावली सुतिकागृह या पाच रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. मनपातर्फे प्रत्येक केंद्रावर दररोज १०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, रुग्णालयांचे इतर कर्मचारी, आंगनवाडी कर्मचारी, आशा वर्कर यांना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर महापालिकेचे 4 आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. लसीकरणापूर्वी संबंधित व्यक्तीच्या नावाची खात्री करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या तापमानाची नोंद करून त्याला लस देण्यात येईल. लस घेतलेल्या व्यक्तीला अर्धा त्रास निगराणीत ठेवण्यात येणार आहे. ‘कोव्हिन’ ॲपवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. मात्र ही लस कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेली नाही. ही लस पूर्णपणे ऐच्छिक स्वरुपाची आहे. तसेच नि:शुल्क लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी योग्य नियोजन करा - पालकमंत्री
उद्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. पाचपावली येथील महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सीन डोस देऊन लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी उपस्थित रहावे अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्याला कोव्हॅक्सीनचे 42 हजार डोस प्राप्त
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोव्हॅक्सीनचे 42 हजार डोस प्राप्त झाले असून, यामध्ये ग्रामीण भागासाठी 17 हजार 600 तर शहरासाठी 24 हजार 400 तसेच कामठी कॅन्टोनमेंटसाठी 500 डोसेसचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यत सर्व आरोग्य सेवकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या बाराही केंद्रांवर लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था झाली असून, प्रत्येक केंद्रावर पाच वैद्यकीय कर्मचारी असलेले पथक लसीकरण मोहिमेत सहभागी होणार आहे.