नागपूर - कोरोना रुग्णाला बरे होण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी ठरणारी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार. रुग्णांमध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी आता म्युझिक थेरपीचा उपयोग करण्यात येत आहे. म्युझिक थेरपीमुळे रुग्णांमध्ये सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होत असून, ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या सेव्हन स्टार रुग्णलायत हा प्रयोग करण्यात आला आहे.
अनेक जण कोरोना झाला या भावनेतूनच धीर सोडतात, उपचारादरम्यान मानसिकरित्या खचून जातात. रुग्णालयाच्या वातावरणात रुग्णांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होते. हे दूर करून, रुग्णाने उपचाराला चांगला प्रतिसाद द्यावा यासाठी नागपूरच्या सेव्हन स्टार रुग्णालयात रुग्णांवर म्युझिक थेरपीचा वापर करण्यात येत आहे. या म्युझिक थेरपीमुळे रुग्णांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होत असल्याचा दावा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आला आहे.
म्युझिक थेरपीची सुरुवात कशी झाली?
सेव्हन स्टार हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सदाशिव भोळे यांचे मित्र डॉ. संदीप बारस्कार यांना कोरोनाची लागन झाली. ज्यावेळी सदाशिव भोळे हे संदीप यांना भेटायला गेले, त्यावेळी संदिप हे काहीसे एकटे आणि नकारात्मक वाटले. त्यांना गिटार उत्तम वाजवता येत असल्याने, त्यांचासाठी घरून गिटार मागवण्यात आली. यावेळी त्यांच्या गिटार वादनाचा आनंद इतर रुग्णांनी देखील घेतला. त्यामुळे रुग्णालयातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत झाली आणि यातूनच रुग्णालयात म्युझिक थेरपीची सुरुवात झाली.
म्युझिक थेरपीमुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती
या म्यूझिक थेरपीमुळे कोरोनाबाधित रुग्णांना सकारात्मक उर्जा मिळत असून, त्यांचा उत्साह वाढत आहे. यामुळे रुग्णाचे शरीर उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचा दावा येथील डॉक्टरांनी केला आहे. तसेच या म्युझिक थेरपीमुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये देखील सकारात्मक वातावर निर्माण होण्यास मदत होत आहे.
हेही वाचा - बिहारचे बाहुबली नेता शहाबुद्दीन यांचे कोरोनामुळे निधन