नागपूर- नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारमध्ये प्रवास करत असलेले तिघांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत हे एकाच कुटुंबातील आहेत.
अपघातामधील मृत हे नागपूरच्या दिघोरी परिसरातील पंचवटी नगर येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. डॉ. बाबुराव श्रावण भुरे (६२) त्यांची पत्नी वंदना बाबुराव भुरे (५०) व मुलगा गणेश बाबुराव भुरे (२५) आणि मृतांची नावे आहेत. हा अपघात नागपूर- अमरावती मार्गावरील धामणा शिवारातील इंडियन पेट्रोल पम्पनजिकच्या अमरजीत ढाब्यासमोर घडला आहे.
अपघातग्रस्त कार ही कोंढालीकडून नागपूर दिशेने जात असता उभा असलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. यामध्ये चालक गणेश भुरे आणि त्यांचे वडील डॉक्टर बाबुराव भुरे या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर मागील सीटवर बसलेल्या वंदना भुरे यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलवावी लागली क्रेन
गणेश भुरे हे कार चालवत होते. त्यांना पुढे उभा असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची कार ट्रकला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रकमध्ये अडकली होती. मृतदेह क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढावे लागले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.