नागपूर - गेल्या दोन महिन्यांपासून नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर आज त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबई महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे. तसे आदेशपर पत्र आज मुंढे यांना मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंढे आणि सत्तापक्ष नेत्यांमधील वाद चांगलाच रंगला होता. अशात मुंढेंच्या या बदलीमुळे विविध तर्क वितर्कांना पांग फुटले आहे. मुंढे सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने स्वतःला होम आयसोलेट करून घेतले आहे.
गेल्या काही महिन्यापासून नागपूर महानगरपालिकेमध्ये मुंढे विरूद्ध सत्ता पक्ष असा संघर्ष पाहायला मिळत होता. याच पार्श्वभूमीवर विविध आरोप प्रत्यारोपसुद्धा पाहायला मिळाले. शिवाय आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात यावी अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. याच चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. तसे आदेशपर पत्र अप्पर मुख्य सचिवांकडून मुंढे यांना पाठवण्यात आले आहे.
बी. राधाकृष्णन नागपूरचे नवे मनपा आयुक्त
तुकाराम मुंढे यांच्या जागी नवे मनपा आयुक्त म्हणून बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सदस्य सचिव म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. प्रत्येक महानगरपालिकेत ते फार काळ टिकत नाहीत.
मुंढेंनी नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून २८ जानेवारीला पदभार स्वीकारला होता. केवळ सात ते आठ महिन्यातच त्यांना पुन्हा बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे. सध्या तुकाराम मुंढे हे कोरोनाग्रस्त असून, ते होम आयसोलेट आहेत. अशातच त्यांच्या बदलीमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. असे असले तरी मनपा आयुक्त व सत्ताधारी पक्ष यांच्यातील वाद सर्वपरिचित आहेत. शिवाय मुंढेंबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे व सत्ताधारीमधला वाद अधिकच पाहायला मिळाला होता. शिवाय स्मार्ट सीटीच्या सीईओ पदावरूनही महानगरपालिकेत घमासाम पाहायाला मिळाले होते. त्याचबरोबर महापौर विरूद्ध मनपा आयुक्त हा वाद देखील शिगेला पोहचला होता. अशात आता मुंढेंच्या बदलीमुळे हा वाद थांबल्याचे चित्र आहे. यापूर्वीही तुकाराम मुंढे हे २००९ साली नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. मात्र, तेथे ही काही दिवसातच त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित करत त्यांची बदली करण्यात आली होती.
मुंढे यांची नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठीच त्यांची बदली केली असल्याचेही तेव्हा बोलले जात होते. शिवाय सत्तापक्षांवर नजर ठेवण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांची मनपा आयुक्त म्हणून निवड करण्याची राजकीय खेळी असल्याच्या चर्चासुद्धा रंगल्या होत्या. असे असले तरी मुंढे आणि वाद हा काही नवीन मुद्दा नव्हताच. प्रत्येक ठिकाणी मुंढे विरूद्ध सत्ताधारी हा आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत होता. नागपुरात ही गेल्या काही दिवसांपासून हाच वाद रंगला होता. दररोज नवीन वाद पुढे येत होते. अशात मुंढेंच्या या बदलीमुळे या वादांना पूर्णविराम लागल्याचे चित्र सध्या आहे.