नागपूर - कोरोनाची तिसरी लाट येऊ नये आलीच तर सप्टेंबर मध्यापासून लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीशी लढताना लागणारे शस्त्र हे 200 लसीकरण वाहनांच्या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. सैन्य म्हणून कोरोना योद्धे सज्ज असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कुठलीही अडचण आल्यास सरकार आपल्या आणि जनतेच्या पाठीशी आहे, असा विश्वास या निमित्याने त्यांनी बोलून दाखवला.
- सीएसआर फंडातून 200 लसीकरण वाहने भेट -
नागपुरातील क्रीडा संकुलात आयोजित 200 लसीकरण वाहन हस्तांतर सोहळ्याप्रसंगी ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी विमला आर तसेच महापारेषनचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते. विदर्भ साह्यता समिती आणि महापारेषनच्या सीएसआर फंडातून या 200 लसीकरण वाहने ही आरोग्य यंत्रणेला आज (शुक्रवारी) हस्तांतरीत करण्यात आली. या सोहळ्याच्या माध्यमातून नागपूर आणि अमरवती विभागाअंतर्गत जिल्ह्यांना तालुका स्तरावर या लसीकरण वाहन उपलब्ध होणार आहे.
![Transfer of 200 vaccinated vehicles from CSR fund](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-vaccinatio-van-distribution-byte-7204321_20082021180354_2008f_1629462834_6.jpg)
- 'जितका जास्त साठा उपलब्ध होईल तितके अधिक गतीने लसीकरण'
कोरोना महामारीशी लढताना औषध नसले तरी एक प्रकारे ढाल या लसीमुळे उपलब्ध झाली आहे. पण ज्या पद्धतीने पुरवठा केंद्र सरकारकडून होत आहे तो समाधानकारक नाही अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी बोलताना व्यक्त केली. सध्याच्या घडीला पहिला आणि दुसरा डोस असे पाच कोटी लोकांचा लसीकरणाच्या टप्पा राज्याने गाठला आहे. जितका जास्त साठा उपलब्ध होईल तितके अधिक गतीने लसीकरण होणार आहे. एका दिवसात 9 लाख लोकांचे लसीकरण करण्याचा विक्रम राज्याने गाठला आहे. यामुळे रोज 10 ते 15 लाख डोसेस मिळाले, तरी लसीकरण करण्यास सक्षम आहोत असे मुख्यंमत्री म्हणाले.
- 'उत्तम कल्पना समोर आली'
यात या याकाळात लसीकरण होणे महत्वाचे असताना जे लोक केंद्रापर्यंत पोहचू शकत नाही आहे, त्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याचेही ते म्हणाले. एक उत्तम कल्पना या निमित्याने पुढे आल्याने याचा फायदा नक्कीच होईल असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
- या उपक्रमातून सद्भावना लसीकरण यात्रा सुरू - महसूलमंत्री
सद्भावना दिवसानिमित्त आज खऱ्या अर्थाने तुम्ही सद्भावना लसीकरण यात्रा सुरू केली आहे. ग्रामीण भागातील, गडचिरोलीमधील वस्तीत, मेळघाटातील पाड्यावर जाऊन गरीबाचे लसीकरण या मोहिमेअंतर्गत होईल. या योजनेचे कौतुक हे जगाच्या पातळीवर झाले पाहिजे एवढी प्रभावी आणि महत्वाकांक्षी ही योजना आहे. कोरोना अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे आपण काळजी घेऊन वागावे आणि लसीकरण करावे असे आवाहन यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
हेही वाचा - आयटी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार - सतेज पाटील