नागपूर - अमरावती-नागपूर रोडवरील बाजारगाव जवळ झालेल्या अपघातात चार ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावर असलेला खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कार दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने सर्व्हिस रोडवर बसची प्रतीक्षा करीत उभ्या असलेल्या पाच प्रवाशांना जबरी धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सख्ख्या भाऊ-बहिणीसह एका मुलाचा समावेश आहे.
चाैघांचा वाटेतच मृत्यू -
ही घटना कोंढाळी (ता. काटोल) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सातनवरी येथे घडली आहे. मृतकांमध्ये बंडू नमोराव सालवनकर (५५), शौर्य सुबोध डोंगरे (९), शिराली सुबोध डोंगरे (६) व चिन्नू विनोद सोनबरसे (१३) यांचा समावेश आहे. तरललिता बाबुलाल सोनबरसे (५०) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पाचही जखमींना लगेच नागपूर येथील रूग्णालयात नेण्यासाठी रवाना करण्यात आले, मात्र यातील चाैघांचा वाटेतच मृत्यू झाला. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
बसच्या प्रतीक्षेत होते प्रवासी सुसाट कारने दिली जबरी धडक -
पाच प्रवासी सातनवरी येथील बस स्थानकाजवळ बसची प्रतीक्षा करीत उभे होते. त्याचवेळी अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणारी अनियंत्रित कार खड्डा चुकविण्याच्या नादात सातनवरी येथील बस स्थानकाजवळील दुभाजकावर आदळली व लगेच सर्व्हिस रोडवर उलटली. या सुसाट कारने रोडलगत उभ्या असलेल्या पाच जणांना जबर धडक दिली. त्यात पाचही जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावासह अन्य एका मुलाचा समावेश आहे. जखमी महिलेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - लोणंदजवळ रेल्वेच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू