नागपूर - सोमवारी दिवसभरात 7 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 158 वर पोहचली आहे. या नव्या रुग्णांमध्ये 5 आणि 6 महिन्याच्या चिमुकल्या बाळांचाही समावेश आहे.
नागपुरात पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाच्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी नोंद करण्यात आलेले सर्व रुग्णांना आधीपासूनच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याबरोबरच नागपुरात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील समाधनाकारक आहे.
गेल्या 24 तासात 10 रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. ज्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील 58 झाली आहे. सध्या नागपुरात रुग्णवाढीचा वेग मंदावला असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसात नागपुरात रुग्णसंख्या सहाच्या वर गेली नसताना सोमनारी 7 रुग्णांची नोंद करण्यात आली. प्रशासनाने नागपुरात लॉकडाऊन नियमांच्या तिसऱ्या टप्प्यात कुठलीही शिथिलता दिली नाही. नागपुरातील कोरोना हॉटस्पॉटमधील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढतच आहे.
नागपूर -- 4 मे
एकूण करोना पॉझिटिव्ह - 158
मृत्यू -- 02
कोरोनामुक्त - 58