नागपूर - रामटेक वनपरिक्षेत्रातील मानेगाव बीट संरक्षित वनक्षेत्र क्रमांक २९३ मध्ये असलेल्या इंग्रजकालीन बिहाडा खाणीतील खड्ड्यात पडून पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक संदीप गिरी हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
हेही वाचा... नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला
रात्र झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाघाला रात्री पाण्याबाहेर न काढता सकाळी काढण्याचे ठरवले. यानंतर सकाळी या वाघाला खाणीमधून बाहेर काढण्यात आले. तसेच नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मृत वाघाचे अंदाजे वय 12 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. पशुवैद्यकीय अधिकारी ट्रान्झिट सेंटर यांच्या अधिकारात मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा... नागपूरमध्ये 5 वर्षीय चिमुकलीची हत्या.. हत्येपूर्वी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
शवविच्छेदन करते वेळी वाघाचे सर्व अवयव नखे, दात व हाडे शाबूत होते. शवविच्छेदनामध्ये विद्यूत स्पर्शाने वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता पशुवैकीय अधिकाऱ्यांनी नाकारली. या वाघाचा पाण्यात पडल्यानंतर श्वास नलिका आणि फुप्फुसामध्ये पाणी शिरल्याने गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वाघाच्या शरीरातील अवयवांचे काही नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविण्यात आले आहेत.