नागपूर - पत्नीचे परपुरुषासोबत असलेले अनैतिक संबंध उघड झाल्यानेच पंकज गिरमकर या तरुणाची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी दिली आहे. पंकजच्या हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी ढाबा मालक जॉगिंदरसिंग ठाकूर, कुक मनोज उर्फ मुन्ना तिवारी आणि शुभम डोंगरे नामक आरोपीला अटक केली आहे. तर, पंकजच्या हत्येत सहभागी वेटर हा पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पंकज हा 29 डिसेंबर रोजी घरून गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नव्हता. त्याच दिवशी त्याचा खून करून मृतदेह आणि दुचाकी 12 फूट खोल खड्यात पुरल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
पंकज हा नागपूर भंडारा मार्गावरील कापसी येथील हलदीराम फूड कंपनीत टेक्निशियन या पदावर कार्यरत होता. त्यामुळे तो पत्नी आणि मुलासह कापसी परिसरातच खोली करून राह होता. तेव्हा त्याच्या पत्नीची घर मालकाच्या परिचयातील जोगिंदरसिग ठाकूरसोबत ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर अनैतिक संबंधात झाले. पत्नीच्या अनैतिक संबंधाविषयी पंकजला माहिती समजताच त्याने ढाबा मालक जोगिंदरसिंग ठाकूर याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याने कापसी भागातील भाड्याचे घर रिकामे करून पुन्हा वर्धेत राहायला सुरुवात केली. नेमकी हीच ताटातूट आरोपीला सहन न झाल्याने त्याने तीन मित्रांच्या मदतीने पंकजचा निर्घृण खून केला. पोलिसांनी अतिशय संयमाने हे प्रकरण हाताळून आरोपींना अटक केली आहे.