नागपूर - शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असणाऱ्या वन प्लस मोबाईल शोरूममध्ये मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी चक्क एकूण २६ लाख रुपयांचे ६५ मोबाईल लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तपासाला सुरुवात केली आहे.
65 महागडे मोबाईल केले लंपास -
नागपूरच्या अत्यंत वर्दळीच्या वेस्ट हायकोर्ट रोडवरील कॉफी हाऊस चौकावर वन प्लस या मोबाईल कंपनीचे शोरूम आहे. मध्यरात्रीनंतर सुमारास चोरट्यांनी शोरूमचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश करून 65 महागडे मोबाईल लंपास केले. सकाळी शोरूमचे कर्मचारी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. डॉग स्कॉट बोलावून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
गुन्हेगारांचा धाडस वाढले -
ज्या कॉफी हाऊस चौकावर चोरीची ही घटना घडली ते अत्यंत वर्दळीचे ठिकाण असून रात्री उशिरापर्यंत त्याठिकाणी लोकांची ये-जा सुरू असते. मुख्य रस्त्यावर असलेल्या शोरूमचा शटर तोडून चोरट्यांनी केलेली 26 लाखांची ही चोरी नागपुरात गुन्हेगारांचे धाडस किती वाढले आहे हे दर्शवणारी आहे. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलीस कसे अपयशी ठरत आहेत, याचा पुरावा देणारीच आहे.
हेही वाचा - ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, छगन भुजबळांची माहिती