नागपूर:- कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यावर्षी राज्यातील शाळा एप्रिल महिन्याच्या अखेर पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. सध्या विदर्भातील भीषण उष्णतेची लाट आली असताना या आदेशामुळे केवळ पालकच नाही तर शिक्षकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री याना लिहिले पत्र लिहिले आहे. एप्रिल महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने राज्यातील भौगोलिक परिस्थितीसह कोणत्याही गोष्टीचा विचार न करता हा निर्णय घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याचे तापमान एप्रिलमध्ये 40 ते 45 डिग्री पर्यत गेले आहे. अशा परिस्थितीत अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पिण्याची आणि विजेची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत. त्यामुळे हा निर्णय चुकीचा असल्याचं मत राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सचिव रवींद्र फडणवीस यांनी पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. एप्रिल महिन्यात जर शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 45 डिग्री तापमानात काम करण्यासाठी मुंबईतील अधिकाऱ्यांना पाठवावे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.