नागपूर : अपक्ष आमदारांना राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व आले आहे. आज राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. यावर आमदार जोरगेवार यांनी ही राजकीय भेट नसून, त्या खास करून माझ्या आईच्या भेटीसाठी आल्याचे सांगत त्यांनी या चर्चेला विराम दिला आहे. आजची भेट राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नसून अगोदरच ठरलेली होती, असेही जोरगेवार माध्यमांशी बोलताना सांगितले. ते मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला मुंबईला जाण्यापूर्वी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेच्या वक्तव्यावर व्यक्त केली नाराजी : राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली असताना अपक्ष आमदारांना खरंच महत्त्वाचे दिवस आले आहे, असेही जोरगेवार बोलताना म्हणाले. मीडिया असो की सरकार असो सगळ्यांचे लक्ष आमच्याकडे वेधले गेले आहेत. चार लाख लोकांचे मतावर आम्ही निवडून आलेले आमदार आहोत, आम्ही घोडे नाही. त्यामुळे घोडे विकत घ्यायचे असेल तर घोड्यांच्या बाजारात जा. मात्र, अशा पद्धतीने शब्द वापरत लोकप्रतिनिधींचा अपमान होत असेल, तर त्या शब्दावर नाराजी व्यक्त केली असल्याचेही जोरगेवार म्हणाले. शिवसेना नेते यांच्या वक्तव्यावर त्यांनी उत्तर दिले.
अनेक अपक्ष आमदारांनी व्यक्त केली नाराजी : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांना मात्र त्यांची नाराजी प्रकट करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेनेचे समर्थित आमदार आशिष जयस्वाल यांनी सत्तेतील मंत्र्यांबाबत जो आरोप केला, त्याला काही प्रमाणात का होईना समर्थन मिळाले आहे. सरकारमधील अनेक मंत्री हे सौजन्यपूर्ण वागणूक देत नसल्याचेही आरोपाला जोरगेवार यांनी दुजोरा दिला आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तक्रार केली असून, दर तीन महिन्यांनी मुख्यमंत्री आणि प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, असे सुचवले होते. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी होकार दर्शवला असल्याचेसुद्धा आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आम्ही आमचे मतदान गुप्त ठेवणार जोरगेवार म्हणाले : राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी अजून माझ्याशी कुठलाही संपर्क साधला नसल्याचे आमदार जोरगेवर यांनी स्पष्ट केले आहे. निवडणुकीच्या काळात अनेक जग मदत मागत असतात. आम्हीही निवडणुकीत मदत मागत असतो. पण, देवेंद्र फडणवीस यांनी अजून संपर्क केला नाही, असे ते म्हणाले. नेमके कोणाला मतदान करू हे सांगणे म्हणजे लोकशाहीचा अपमान होईल. मात्र, गुप्त मतदान पद्धतीने मतदान करणार आहे. आज सांगितले तर पुढच्या तीन-चार दिवसांत माझे महत्त्व कमी होईल. आज मुंबईला चाललो मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. दहा तारखेला सद्सद्विवेक बुद्धी वापरून मतदान करणार, असेही ते म्हणाले.