नागपूर - विदर्भात कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी नागपुरात आढळून आला. त्यावेळी कोरोनाच्या रुग्णावर कोणते उपचार करावे ते कसे करावे आणि कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. मात्र नागपुरातील एका महिला डॉक्टरनं दाखवलेल्या इच्छा शक्ती आणि जिद्दीच्या जोरावर पहिल्या रुग्णाला ठणठणीत बरं करण्यात आलं. नवरात्र उत्सवानिमित्त समाजातील अशाच कर्तृत्ववान स्त्रियांचा रिपोर्ट वाचकांसाठी आणत आहोत.
या भागात विदर्भातील पहिल्या कोरोना रुग्णावर उपचार केलेल्या महिला डॉ. तिलोत्तमा पराते यांची माहिती जाणून घेणार आहोत. डॉ. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात त्या मेडिसीन विभागाच्या प्रमुख आहेत.
रोज कोरोना रुग्णांवर उपचार करणे, रुग्णालयातील ओपीडी सांभाळणे सोबतच एक गृहिणी म्हणून घर सांभाळणे अशा अनेक जबाबदाऱ्या त्या यशस्वीरित्या पार पाडत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील रणरागिणी असलेल्या डॉ. तिलोत्तमा पराते गेल्या सात महिन्यांपासून तहान भूक विसरून रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहेत.
11 मार्च रोजी नागपूर शहरात किंबहूना विदर्भात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळून आला. त्यावेळी एकही कोरोनाचा अनुभव असलेला डॉक्टर उपलब्ध नसतानाही या डॉ.तिलोत्तमा पराते यांनी ही परिस्थिती यशस्वीरित्या सांभाळली.
एक डॉक्टर म्हणून समोरील आव्हान स्वीकारत डॉक्टर पराते यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. मात्र त्यावेळी आयसोलेशन वॉर्ड सारख्या कुठलाही प्रकार रुग्णालयात उपलब्ध नव्हता. तरीदेखील त्यांनी पहिल्या रुग्णावर योग्य उपचार करून त्याला ठणठणीत बरे करण्याचा मान मिळवला. तिथून सुरू झालेला प्रवास आज सात महिन्यानंतर बराच पुढे आला आहे. आज त्या एकाच वेळी त्या चारशे रुग्णांचा कोरोना वॉर्ड सांभाळत आहेत.
घरच्यांनी दिलेल्या पाठबळा मुळेच हे शक्य झाल्याचं त्या सांगतात. कोरोना वॉर्ड, ओपीडी आणि घर सांभाळताना डॉक्टर पराते यांची नक्कीच एक महिला म्हणून तारेवरची कसरत सुरू आहे. मात्र सहकारी डॉक्टर पती आणि कुटुंबीय त्यांच्या मदतीने या या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडत आहेत.