रत्नागिरी - मुंबईतील चाकरमान्यांकडून गावकऱ्यांना मदत हा आजवरचा शिरस्ता. पण, कोरोनाच्या संकटकाळात हा शिरस्ता कोकणातील गावकऱ्यांनी मोडून काढला आहे. सध्या संपूर्ण मुंबई ठप्प असल्याने चाकरमान्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे कोकणवासी मुंबईकरांच्या मदतीसाठी धाऊन आले. ओणी- कोंडीवळेतील नागरिकांनी तब्बल 3 टन धान्य मुंबईतील नागरिकांसाठी रवाना केले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना मदत हवी आहे. गावकऱ्यांना नेहमीच चाकरमानी मदत करतात. मात्र आता चाकरमान्यांना मदतीची गरज असल्याने गावकऱ्यांनी 2 टन तांदूळ आणि 1 टन डाळ मुंबईला पाठवले. सध्या सर्व काही ठप्प असल्याने आपल्या गावातील मुंबईत राहणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.
मुंबईतील कुटुंबांची या गावकऱ्यांनी यादी तयार केली. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी 5 किलो धान्य पोहोचवण्यात आले. यावेळी गाडीची समस्या उभी राहिल्यानंतर स्थानिक आमदार राजन साळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यावर देखील तोडगा काढण्यात आला. सध्या ओणी - कोंडीवळे गावाने केलेल्या कार्याची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे.