नागपूर - गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या नामांतरणावरून माजी महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. नामांतरणाची शिवसेनेची कृती बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला तृप्त करण्यासाठी नसून शिवसेना आपला अजेंडा राबवण्यासाठी, हे करत असल्याचा आरोप अणे यांनी केला आहे.
गोंडवाना हे नाव आधीपासूनच रुजलेले-
गोरेवाडा किंवा गोंडवाना हे आधीपासूनच रुजलेले नाव आहे. नागपूर ज्या गोंडानी वसवले, इथे राज्य केले. इंग्रज येण्यापूर्वीही गोंडवाना हे नाव होते. त्यांच्या नावाने गोरेवाडा प्राणी उद्यानाला नाव देणे संयुक्तिक होते. गोरेवाडाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांना बाळासाहेबांच्या आत्म्याला तृप्त करायचे नाही तर शिवसेनेला स्वतःचा अजेंडा राबवायचा असल्याची टीकाही श्रीहरी अणे यांनी केली.
शिवसेनेला विदर्भात नाही राजकीय स्थान-
शिवसेनेला माहीत आहे की विदर्भात त्यांना राजकीय स्थान नाही. तेच स्थान या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे, असेही श्रीहरी अणे म्हणाले. गोरेवाडाला प्राणी उद्यानाला बाळासाहेब यांचे नाव देण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या विदर्भवाद्यांचा आवाज दाबण्यात आला असून विदर्भवाद्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो, असेही श्रीहरी अणे म्हणाले.
शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया-
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेली घटना दुर्दैवी आहे. असं घडायला नको होत. अशा घटनांमुळे मूळ आंदोलन मागे पडत असल्याचं मत विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी व्यक्त केलं. कायदा कुणीही हातात घेऊ नये, हिंसेची चौकशी केली पाहिजे. पण त्यामुळे शेतकऱ्यांचा मूळ मागण्या सुटतील का हे ही लक्षात घेणे आवश्यक असल्याचं श्रीहरी अणे म्हणाले.
हेही वाचा- '''त्या'' शुभेच्छा संदेशाचा माझ्याशी काहीही संबंध नाही'
हेही वाचा- दिल्लीत शेतकरी आंदोलनात नंदुरबारच्या महिला शेतकऱ्याचा मृत्यू