नागपूर- शहरातील हुडकेश्वर सिग्नलवर एका चारचाकी जीपला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. या भीषण अपघाताचे चित्रीकरण येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
हेही वाचा- बोगस 'रॉ' अधिकाऱ्याचा पर्दाफाश; पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात झाला होता दाखल
अपघातातील जीपमध्ये 12 ते 15 प्रवासी होते. हे सर्व रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या वस्तू विकण्याचे काम करतात. राहुल बंशी बंजारा आणि भयरुलाल गौर यांचा यात जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील सर्वजण मध्यप्रदेशच्या मंदसोर जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दिघोरी पुलावरून मानेवाड्याकडे हुडकेश्वर सिग्नल पार करतेवेळी म्हाळगी नगरकडून अयोध्या नगरकडे येणाऱ्या ट्रकने जीपला जोराची धडक दिली. ट्रक चालकाने सिग्नल तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.