मुंबई - कॉर्डिलिया क्रुजवर एनसीबीने (अमली पदार्थविरोधी पथकाने) केलेल्या कारवाईवर अनेक आरोप - प्रत्यारोप करण्यात आले आहेत. या कारवाईत एनसीबीकडून पंचनाम्यासाठी वापरण्यात आलेले पंचही फुटले. हे पाहता पंच निवडताना एनसीबीकडून हलगर्जीपणा झाला का? असा प्रश्न उद्भवतो. मग पंच नेमका कसा असावा? या प्रश्नाचे उत्तर ईटीव्ही भारतने ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांच्याकडून जाणून घेतले. तसेच, सातपुते यांनी या प्रकरणातील पंचांमुळे न्यायालयात केसवर काय परिणाम होऊ शकतो याबाबत मत व्यक्त केले.
हेही वाचा - समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू आहे वाद, जाणून घ्या, कागदपत्रात छेडछाड केल्यास काय होते कारवाई
पंचांच्या विश्वासार्हतेवर शंका का?
कारवाईत आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्यासह वीस जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. क्रुजवर केलेल्या कारवाईनंतर जो पंचनामा एनसीबीकडून करण्यात आला. त्या पंचनाम्यासाठी किरण गोसावी, मनीष भानुषाली आणि प्रभाकर साईल हे पंच होते. मात्र, आता या पंचांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात मुख्य पंच असलेला प्रभाकर साईल यांनी या प्रकरणात पंच म्हणून आपल्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या, तसेच आर्यन खान याला या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी 25 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली असून विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांना आठ कोटी रुपये द्यायचे ठरले होते, असा आरोप केला आहे.
प्रकरणात असणारा दुसरा पंच के.पी. गोसावी हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला पंच आहे. पुणे पोलिसांकडे के.पी. गोसावी यांच्या विरोधात तक्रारी दाखल असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे, या पंचांच्या विश्वासार्हतेला तडा जाण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणात असलेला तिसरा पंच मनिष भानुषाली आणि के.पी. गोसावी यांनी क्रुजवरील धाडीनंतर सर्व आरोपींना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यासाठी केलेल्या कारवाईमध्ये भाग घेतला असल्याने हे पंच जाणून बुजून तयार केले गेले आहेत का? याबाबत देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पंचनामा करण्यासाठी पंच कसा असावा?
कोणतीही तपास यंत्रणा एखादी कारवाई झाल्यानंतर त्याबाबतचा पंचनामा करत असते. पंचनामा पूर्ण करण्यासाठी तपास यंत्रणेला काही पंचाच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या लागतात. तपास यंत्रणेला हे पंच निवडत असताना पंच असणारी व्यक्ती ही प्रतिष्ठित व्यक्ती असणे गरजेचे आहे. तसेच, त्या व्यक्तीची विश्वासार्हता असणे गरजेचे आहे. अशाच व्यक्तींना पंच म्हणून निवडण्यात आले पाहिजे, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी दिली. तसेच, पंचांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्यास याचा परिणाम न्यायालयात होत असल्याचे मत नितीन सातपुते यांनी व्यक्त केले.
कमकुवत पंचांमुळे केस न्यायालयात टिकणार नाही
कार्डेलिया क्रुजवर एनसीबीने केलेल्या कारवाईत पंच म्हणून असलेल्या प्रभाकर साईल यांनी एनसीबीच्या कारभारावर बोट ठेवल्याने न्यायालयात पंचांच्या साक्षीमुळे केसवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, पंचाने दमदाटी करून साक्ष करून घेतली, असे सांगितल्यास न्यायालयात ही बाब तपास यंत्रणेच्या विरोधात जाऊन आरोपींना त्याचा फायदा होण्यास जास्त मदत होणार आहे. यासोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पंच म्हणून न्यायालयासमोर उभे केल्यास त्या पंचाच्या विश्वासार्हतेवर न्यायालय समाधानी होणार नाही, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - मूळ विषयाला बगल देण्यासाठीच समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक - किरीट सोमैया