नागपूर - रस्त्यावर सापडलेले शंभर रुपये कुणी परत करत नाहीत. मात्र, नागपुरातील एका खासगी सुरक्षा रक्षकांनी रस्त्यावर सापडलेली बॅग ज्यामध्ये २४ लाखांची रोकड भरलेली होती ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
युवराज सदाशिव चामट असे या प्रामाणिक सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्यावेळी युवराजसोबत गणेश चतुरकर, शुभम संजय हरडे, सनी विजय येवले हे देखील गार्ड उपस्थित होते. मात्र, बॅगमध्ये काय असेल या भीतीने कुणीही त्या बॅगजवळ गेलं नाही. मात्र, युवराज यांनी धाडस दाखवत बॅग उघडून बघितली तेव्हा ती बॅग नोटांच्या बंडलांनी भरलेली होती. त्यानंतर युवराज यांनी क्षणाचाही विचार न करता थेट सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. ही घटना नागपूर शहरातील मुंजे चौकात घडली आहे. आज पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या हस्ते युवराज यांच्यासह अन्य तिघांचा सत्कार करण्यात आला आहे.
सुरक्षा रक्षकाचा सत्कार
ही घटना काल संध्याकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंजे चौकात घडली आहे. मुंजे चौकात महामेट्रोचे स्टेशन आणि इंटरचेंज सेंटर असल्याने त्या भागात मोठी गर्दी असते. त्याच ठिकाणी अनेक बँकेचे एटीएम सेंटर देखील आहे. काल संध्याकाळच्या सुमारास त्यातील एका एटीएम सेंटर समोर बेवारस बॅग आढळून आल्याने उपस्थित असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचवेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवराज चामट यांनी सर्वाना बाजूला सारत स्वतः बॅगजवळ जाण्याचे धाडस केले. त्या बॅगमध्ये काय असेल? बॅग उघडल्यानंतर घातपात होईल का? यासह अनेक प्रश्न त्यांना सतावत होते. अशात युवराज यांनी धोका पत्करून ती बॅग उघडून बघितली तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल भरलेले होते. त्यानंतर युवराज यांनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या स्वाधीन केली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस निरीक्षक सबनीस हे देखील थक्क झाले होते. आज युवराज यांच्यासह अन्य सुरक्षा रक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे.
बॅगमध्ये असलेल्या धनादेशावरून त्या व्यक्तीचा शोध
सुरक्षा रक्षक युवराज यांनी २४ लाख रोकड भरलेली बॅग पोलिसांना परत केल्यानंतर त्या बॅगमध्ये असलेल्या धनादेशांवर असलेल्या नावांच्या आधारे मूळ मालकाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील श्रीराम सेल्स नामक फर्मची ही रोकड असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना याबाबत सूचना देण्यात आली. श्रीराम सेल्सचे कर्मचारी दररोज वेगवेगळे व्यापारी आणि प्रतिष्ठानातून रोकड अन् धनादेश संकलित करतात अन् ते बँकेत जमा करतात. काल देखील हे करत असताना पैशाने भरलेली बॅग दुचाकीवरून खाली पडली. सुदैवाने युवराजच्या हाती ती बॅग लागल्याने संपूर्ण रोकड आणि धनादेश सुरक्षितरित्या मूळ मालकाला परत मिळाले आहेत.
श्रीराम सेल्सकडून देखील युवराज यांचा सत्कार
ज्या श्रीराम सेल्सची ही बॅग होती त्यांनी देखील सुरक्षारक्षक युवराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला आहे. त्यांना बक्षीस म्हणून ११ हजारांचा धनादेश देण्यात आला आहे.