नागपूर - नागपूर महानगरपालिका क्षेत्रामधील ( Nagpur Municipal Corporation ) इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा १ डिसेंबर २०२१ पासून ( School Open in Nagpur ) सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. त्या शाळा गुरूवार आजपासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या अधीन राहून शहर क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व शाळा सुरू करण्यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. ( Municipal Commissioner Radhakrishnan b. ) यांनी आदेश जारी केले आहेत.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या मनपाच्या ११६ शाळांसह १०५३ खासगी शाळा अशा एकूण १०६९ शाळा आजपासून सुरू होतील. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या १०६९ प्राथमिक शाळांमध्ये एकूण २ लाख ४९ हजार ७१५ विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये मनपाच्या शाळेमध्ये ९३१९ विद्यार्थी तर अन्य खासगी शाळांमध्ये २ लाख ४० हजार ३९६ एवढी विद्यार्थी संख्या आहे. प्राथमिक शाळेच्या पहिल्या दिवशीपासूनच कोव्हिड संदर्भातील सर्व नियमांचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पालन करण्याबाबत आवश्यक उपाय योजना आखण्याचे निर्देशही मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
नियमांचे काटेकोरपणे पालन करा -
शाळा सुरू करताना शाळांनी मनपाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी, शिक्षक व अन्य कर्मचा-यांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायजरचा वापर करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे सक्तीचे नसून पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आलेले आहे. शाळेमध्ये वर्गात किंवा अन्य परिसरात दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, प्रत्येकाने फेस मास्क/फेस कव्हर वापरणे बंधनकारक, वारंवार हात धुणे आवश्यक करण्यात आले आहे. वर्गामध्ये विद्यार्थीसंख्या जास्त असल्यास दोन पाळीमध्ये शाळा घेणे, एका बाकावर एक विद्यार्थी बसेल अशी व्यवस्था करणे, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर असावे, एका वर्गात १५ ते २० विद्यार्थी असावेत अशी व्यवस्था करण्याचेही आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांसाठी सूचना -
शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोजचे कोव्हिड लसीकरण आवश्यक आहे. शिंकताना, खोकताना स्वत:चे तोंड व नाक हात रूमाल टिश्यू पेपर अथवा दुमडलेल्या हाताच्या कोपराने झाकावे. वापरलेल्या टिश्यू पेपरची विल्हेवाट आरोग्यदायी रितीने लावण्यात यावी. प्रत्येकाने आपल्या आरोग्याचे स्वत: बारकाईने निरीक्षण करावे आणि कोणतीही लक्षणे किंवा आजार असल्यास वेळेत त्याची माहिती द्यावी व उपचार करून घ्यावे अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.