नागपूर - सुमारे दीड वर्ष निलंबनाचा वनवास भोगल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये पुनरागमन करणाऱ्या सतीश चतुर्वेदी यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत त्यांचे स्वागत केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर नागपुरातील काँग्रेस कार्यकर्ते त्यांची आतुरतेने वाट बघत होते. दोन दिवसांनंतर त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर मीडियासोबत बोलताना ते म्हणाले की सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला पक्षात घेतले, मी त्यांचे आभार मानतो. मला पक्षाबाहेर काढले होते, तरी मी पक्षाचेच काम करत होतो. आता पुन्हा पक्षात आलो आहे, त्यामुळे नक्कीच नागपुरात काँग्रेसमधील मरगळ दूर करण्याचे काम करू. माझा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी जरी शिवसेनेत गेला असला तरी प्रत्येकाला स्वतः बद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
मुलाला पुन्हा काँग्रेसमध्ये आणाल का? या प्रश्नावर त्यांनी मात्र मौन साधले. सतीश चतुर्वेदी काँग्रेसमध्ये परत आल्यानंतर नागपुरात विलास मुत्तेमवार विरोधी गटात आनंद असून मुत्तेमवार विरोधी गटाचेच कार्यकर्ते व नेते स्वागताला आले होते. यावेळी खुद्द शहर अध्यक्ष विकास ठाकरे अनुपस्थित होते