नागपूर - जुलै 2021 मध्ये नागपुरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरासह शहरातील संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने रेकी केली ( reiki of hedgewar smriti bhavan ) होती. अशी खळबळजनक माहिती यावर्षी जानेवारी महिन्यात समोर आली होती. केंद्रीय तपास यंत्रणांकडून नागपूर पोलिसांना ही माहिती देण्यात आली होती. रईस अहमद असादउल्ला नामक दहशतवाद्याला काश्मीर पोलिसांकडून ( Terrorist Raees Ahmed Asadullah Sheikh ) अटक करण्यात आल्यानंतर त्याने नागपूरला दोन दिवस मुक्काम करून आरएसएससह अनेक संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्याचा खुलासा केला होता, तेव्हा पासून नागपूर शहर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक त्याचा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
नागपूरला रेकी करण्यासाठी आला रईस - 28 वर्षीय रईस अहमद असादउल्ला शेख हा अवंतीपुरा येथील निवासी आहे. तो जुलै 2021 मध्ये तब्बल दोन दिवस नागपूराला मुक्कामी थांबला होता. दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यात त्याने रेशीमबागेतील स्मृती मंदिराची रेकी केली होती. पाकव्याप्त काश्मीरातील कमांडर ओमर यांच्या आदेशाने रईस अहमद असादउल्ला शेख नागपूरला रेकी करण्यासाठी आला होता याचा खुलासा झाला आहे. मात्र, नागपूरला आल्यानंतर थेट आरएसएसची रेकी करणे सहज शक्य नाही, त्यामुळे त्याला या कामात कुणी-कुणी मदत केली होती, याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न एटीएस कडून सुरू आहेत.
दहशतवादी रईसचा नागपूर दौरा - दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख हा 13 जुलै 2021 रोजी विमानाने काश्मीरहून मुंबईला पोहचला होता,त्यानंतर त्याच दिवशी तो विमानाने नागपुरात दाखल झाला.रईसने नागपूरला आल्यानंतर नागपुरातील हस्तकाशी संपर्क साधला असावा असा पोलिसांना दाट संशय आहे. नागपूरला राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तो ऑटोरिक्षाने सीताबर्डी भागात पोहचला. सीताबर्डी येथी एका हॉटेलमध्ये त्याने एक खोली बुक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला तो महालमधील संघाच्या मुख्यालयाची रेकी करायला गेला. मात्र, त्याभागात तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात असल्याने त्याला रेकी करता आली नव्हती म्हणून त्यानंतर तो रेशीमबाग मैदानात आला. येथून त्याने तिथे डॉ. हेडगेवार स्मृती मंदिराची व्हिडीओ शूटिंग करून रेकी केल्याचे उघड झाले आहे.
रेकी झाल्याच्या खुलाश्यानंतर सुरक्षेत वाढ - पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरासह शहरातील संवेदनशील ठिकाणांची रेकी केल्यानंतर पोलिसांनी हेडगेवार स्मृती मंदिर, महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा वाढ करण्यात आली होती. तेव्हा पासूनचं शहरात पोलिसांच्या परवानगी शिवाय ड्रोन उडवण्याला बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा - डॉ हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणारा दहशतवादी नागपूर एटीएसच्या ताब्यात