नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमांत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा येणार की नाही यावर सस्पेन्स वाढला आहे. संघाच्या कार्यक्रमात रतन टाटा येणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख पाहुण्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने यावर्षी प्रमुख पाहुण्यांच्या अनुपस्थितीतच या कार्यक्रमाचा समारोप होणार असे दिसत आहे.
गेल्या काही काळात संघ आणि रतन टाटा यांच्यातील जवळीक चर्चेचा विषय बनलेला होता. त्या अनुषंगानेच यावर्षीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा येणार असल्याची चर्चा रंगली होती. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित होते. यावर्षी रतन टाटा यांच्या नावाची उत्सुकता होती, पण संघाच्या निमंत्रण पत्रिकेत कोणत्याही प्रमुख पाहुण्यांच्या नावाचा उल्लेख नसल्याने सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.
कोणत्याही प्रमुख पाहुण्याच्या शिवाय संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. यावर्षीच्या प्रशिक्षण वर्गासाठी देशभरातून ८८२ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. त्यांच्या प्रशिक्षणाचा समारोप १६ जूनला होणार आहे. प्रमुख पाहुण्यांच्या शिवाय यावर्षी समारोपीय कार्यक्रम होणार असल्याने सरसंघचालक मोहन भागवत काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.