नागपूर - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य हे मुख्यमंत्री यांनी अॅक्टिव्ह व्हावे यासाठी केले आहे. त्यांचा अपमान करण्याचे उद्दिष्ट त्या वक्तव्यातून नव्हते, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. ते नागपुरात बोलत होते. हा वाद मिटण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बॅक टू पॅवेलियन करण्याची गरज आहे असे मला वाटतं असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.
हेही वाचा - नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO
महाराष्ट्राचा विकास करण्यात महाविकास आघाडी अपयशी -
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांना केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पण राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राचा विकास करण्यात अपयश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिरीयस नाहीत. जे प्रयत्न विकासाच्या दृष्टीने होणे अपेक्षित आहेत, कोरोनाच्या काळात लोकांना मदत करणे, पावसाळ्यात दरड कोसळून लोकांचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना मदत करणे गरजेचे होते. पण, त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे असे वक्तव्य निघाले आहे. पण, यामुळे मुख्यमंत्री यांचा अपमान करणे हे उद्दिष्ट नाही. महाराष्ट्राचा विकास व्हावा अशीच भूमिका यामागे आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
कायदा सर्वांसाठी समान आहे. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. जे काही राणे यांना या वक्तव्यातून मांडायचे होते, ते त्यांची भूमिका मांडतील. लोकांना न्याय देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. यामुके ते वक्तव्य केले आहे, असे आठवले यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत परत यावे - आठवले
शिवसेना आणि भाजपची मागील 30 वर्ष युती राहिली आहे. आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सामनातून अनेकवेळा टीका केली होती. यामुळे अनेक आमदार आणि पदाधिकारी यांना वाटते की, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतची आघाडी तुटून सेनेने भाजपसोबत आले पाहिजे. यामुळे नारायण राणे यांनी तसे वक्तव्य केले असावे, असे रामदास आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे यांना आवाहन आहे की, त्यांनी बॅक टू पॅवेलियन येण्याचा विचार करणे गरजेचे आहे. यात नारायण राणे यांनाही राग हाच आहे की, ते भाजपला सोडून गेलेत. यामुळे उद्धव ठाकरे भाजपमध्ये आले तर हा वाद मिटेल असे वाटत असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा - आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे