नागपूर - कोरोनाची तिसरी लाट येणार असे गृहीत धरले जात आहे. या लाटेत लहान बालके सर्वाधिक प्रभावित होतील अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लहान मुलांसाठी २०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय प्रस्तावित करण्यात आले आहे.
महापौरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात केला दौरा -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाचे वेळीच पूर्व नियोजन करण्याचा नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या संबंधात महापौर दयाशंकर तिवारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज नवीन प्रशासकीय इमारत विद्यापीठ परिसराचा दौरा केला. यावेळी प्र. कुलगुरु डॉ. संजय दुधे उपस्थित होते. नागपूर मनपातर्फे लहान मुलांसाठी २०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय येथे प्रस्तावित आहे. सध्या नागपूर विद्यापीठाचे कार्यालय येथील तळमजल्यावर सुरु आहे. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या माळयावर ऑक्सिजन सोयीयुक्त १५० खाटा व ५० आय. सी. यू. खाटांचे लहान मुलांसाठीचे रुग्णालय प्रस्तावित आहे. या इमारतीमध्ये मोठे सभाकक्ष व खोल्या आहेत. सोबतच येथे पालकांना थांबण्यासाठी सुध्दा व्यवस्था केली जाईल.
चिमुकल्यांच्या मनोरंजनाची पूर्ण व्यवस्था -
मनपातर्फे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी टी. व्ही.ची व्यवस्था असेल. ज्यामध्ये त्यांना कार्टून फिल्म दाखविल्या जातील. भिंतीवर कार्टून चित्र असतील. या रुग्णालयात लागणाऱ्या सर्व उपकरणाची व्यवस्था विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेन्द्र फडणवीस करणार आहेत. मनपातर्फे पाण्याची व्यवस्था, ऑक्सिजन, खाटांची व्यवस्था करण्यात येईल. बालकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीसुद्धा व्यवस्था केली जाईल. महापौरांनी या कार्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचीसुद्धा मदत घेण्याचे आवाहन केले आहे.