नागपूर - येथील मध्यवर्ती कारागृहात कर्तव्यावर असलेले 102 कर्मचारी आज तब्बल 21 दिवसानंतर घरी परतले. कोरोनाच्या भीतीने राज्यातील महत्त्वाची अनेक कारागृहे लॉकडाऊन करण्यात आली होती. त्यामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा देखील समावेश होता.
1 मेपासून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारागृहात बाहेर पडता आले नव्हते. मात्र, आज या सर्व कर्मचाऱ्यांना घरी परत जाण्यासाठी सुट्टी मिळाली.
राज्यातील काही कारागृहांत कैद असलेल्या बंदीवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वपूर्ण कारागृहात लॉकडाऊन घोषित केला होता. कारागृहात काम करणारे कर्मचारी कामासाठी आत आणि काम संपवून घरी परत जात होते. ज्यामुळे संक्रमण होण्याची भीती सर्वाधिक असल्याने नागपूर मध्यवर्ती कारागृह लॉकडाऊन करण्यात आले होते.
त्यानुसार कारागृहात काम करणारा एकही अधिकारी किंवा कर्मचारी पुढील आदेशापर्यंत बाहेर पडू शकणार नाही, असे सांगण्यात आले. आज 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर सर्व 102 कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळाली आहे. आज हे सगळे बाहेर आले असून त्यांची जागा आता दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. 21 दिवसानंतर बाहेर पडल्याने सगळ्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.