नागपूर - गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे नेते राम नेवले यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. ७० वर्षांचे होते. राम नेवले यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी राम नेवले यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनाची मशाल हाती घेतली होती. त्यांनी नुकतेच विदर्भ राज्य आंदोलन पार्टी नावाने पक्ष स्थापन केला होता. या शिवाय ते जय विदर्भ पक्षाचे संस्थापक होते याशिवाय ते शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष देखील होते. मंगळवार रात्री राम नेवले यांच्या छातीत दुःखत होते. त्यातच मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
राम नेवले यांचा जीवन प्रवास
राम नेवले यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९५१ साली नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे झाला. १९८४ मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. कालांतराने ते संघटनेतून बाहेर पडले. नंतरचे सर्व आयुष्य त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी झोकून दिले. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी शेवटपर्यत लढा दिला.
हेही वाचा - शरद पवार उद्यापासून चारदिवसीय विदर्भ दौऱ्यावर; नागपूर, यवतमाळला देणार भेट