नागपूर - नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नूतन लॉजमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती समजताच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धाड टाकून एका तरुणीची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला सुद्धा अटक केली आहे. शैलेश कामडी, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहिती -
नागपूर शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सीताबर्डी बाजार परिसरात सदैव गर्दीने गजबजलेला असतो. याच परिसरात नूतन लॉजदेखील आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला समजली होती. माहितीची सत्यता पटवण्यासाठी पोलिसांनी एकाला लॉजमध्ये पाठवले होते. त्याने चौकशी केल्यानंतर आरोपीने एक तरुणी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले. सौदा पक्का होताच त्याने पोलिसांना इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाड टाकून तरुणीला ताब्यात घेऊन एका आरोपीला अटक केली.
तरुणीची सुधारगृहात रवानगी -
देह व्यवसाय करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणीला आणि आरोपीला सीताबर्डी पोलीसांच्या हवाली केल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तरुणीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
हेही वाचा - नागपूर शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; शहराला पाणीपुरवठा करणारे धरणं भरले