नागपूर - ठाण्यातील रहिवासी बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांच्या आत्महत्या प्रकरणी नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी यशोधर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तत्कालीन सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठाणे येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सचिन साबळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अमितेशकुमार यांनी केले होते निलंबित
साबळे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्यांना निलंबित केले होते. आता पोलीस निरीक्षक राणकांत दुर्गे यांचा सहभाग दिसून येत असल्याने त्यांनादेखील निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे हे सध्या पोलीस नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
लाखो रुपये उकळल्याचा आरोप
सचिन साबळे यांनी ठाण्यात 18 फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. नागपुरातील एका अन्य आत्महत्या प्रकरणात गोवण्याची धमकी देत यशोधरानगर पोलीस स्टेशनचा तपासी अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक) दीपक चव्हाण आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांनी लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. 18 फेब्रुवारीला सचिन साबळे यांनी एक ई-मेल लिहून आत्महत्या केल्यानंतर ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये नागपुरातील तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी उपनिरीक्षक दीपक चव्हाणला आधीच अटक करण्यात आली आहे.
डायरीतून झाला खुलासा
१८ फेब्रुवारीला सचिन साबळे यांनी आत्महत्या केली होती. घटनास्थळी पोलिसांना मृत सचिन साबळे यांची एक डायरी मिळून आली होती. त्याआधारे अंबरनाथ पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण यांना ताब्यात घेतले आहे. याच डायरीमध्ये रमाकांत दुर्गे यांच्यासह अनेकांची नावे असल्याचे समजते. त्याआधारे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण आणि रमाकांत दुर्गे यांना निलंबित केले आहे.