नागपूर - कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनलॉक महाराष्ट्र अंतर्गत मुंबई आणि उपनगरातील चाकरमानी वर्गासाठी लोकल सेवा बहाल करण्यात आली आहे. मात्र मुंबई वगळता राज्यातील इतर भागात आद्यपाही रेल्वे कडून मासिक पास धारकांना कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे गरीब नोकरदार वर्गाची आर्थिक पिळवणूक सुरू आहे. कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावात कशीबशी वाचलेल्या नोकरीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात रोजच्या प्रवासाचा खर्च भागवणे देखील कठीण होऊन बसले आहे. त्यातही घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न रोज प्रवास करणाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आमचा आणि कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून रेल्वेची मासिक पास सेवा सुरू कराव. शिवाय आर्थिक विवंचनेत अडकलेल्या कुटुंबांची या कोंडीतुन सुटका करावा, अशी मागणी कामा निमित्ताने रोज नागपुरात येणाऱ्या चाकरमान्यांनी केली आहे.
नागपूर शहरात हे मध्य भारतातील सर्वात मोठे शहर आहे. शिवाय नागपूर हे उपराजधानी चे शहर असल्याने वर्धा, पुलगाव, धामणगाव, अमरावती भंडारा, गोंदिया, तुमसर, काटोल, रामटेक आणि नरखेडे येथून हजारो चाकरमानी कामाच्या निमित्ताने नागपुरला येतात. मात्र रेल्वेची मास सेवा बंद असल्याने या सर्वांना खासगी वाहनाने किंवा एसटी बसने प्रवास करावा लागतो आहे. ज्यामुळे आर्थिक भुर्दंड देखील सहन करावा लागतो आहे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आमच्या मागणांचा सहानभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी या कामगार वर्गाने केली आहे.
पश्चिम आणि उत्तर रेल्वेकडून मासिक पास सेवा सुरू
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पश्चिम आणि उत्तर रेल्वे कडून मासिक पास सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र केवळ मध्य रेल्वेने मासिक पास सेवा स्थागित करून ठेवलेली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने सुद्धा मासिक पास सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना मासिक पास सुविधा का दिली जात नाही. या आशयाची एक याचिका रेल्वे परिषदेकडून न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे यावर मध्य रेल्वे प्रशासन कोणती भूमिका घेणार? याकडे प्रवासी वर्गाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे - बाळा नांदगावकर