नागपूर - मुंबई आणि पुणे येथे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( Nana Patole on Ward formation ) या पक्षांनी आपल्या सोयीने केलेल्या प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. सोबत राहून मित्र पक्षाचे नुकसान होत असेल तर बरोबर नाही, असे टोला देखील नाना पटोले ( Nana Patole news Nagpur ) यांनी लगावला. त्यामुळे, राष्ट्रवादी नंतर आता शिवसेनाही काँग्रेसच्या नाराजी नाट्याच्या रडारवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच नालेसफाई विरोधात याचिका काँग्रेसने टाकली असल्याने त्यातही वाद निर्माण होणार आहे.
हेही वाचा - Stop Widow Tradition : महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल, विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक
मुंबईतील नालेसफाईवर काँग्रेस विरुद्ध शिवसेना वाद यंदाही रंगणार आहे. यात भष्ट्राचार झाल्याचा आरोप करत काँग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर माध्यमांनी प्रश्न केला असता पटोले यांनी ही याचिका भ्रष्टाचारावर नसून पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याने मुंबईच्या जनतेसाठी काँग्रेस कोर्टात गेली आहे. यात भ्रष्टाचार हा भाग नाही, असेही नाना पटोले म्हणालेत. पण, यामुळे राष्ट्रवादीनंतर शिवसेनेसोबत वाद पेटणार का? याकडे लक्ष लागले आहे.
धर्माच्या नावाने राजकारण काँग्रेस करत नाही - ज्ञानवापी मस्जिदच्या वादात आम्हाला पडायचे नाही. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहे. पण, काही लोक हे सत्तेसाठी धर्माचा वापर करतात. धर्माच्या नावावर काँग्रेस राजकारण करत नाही, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला. औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला, त्यांनी तो निर्णय कुठल्या आधारावर घेतला असावा तो त्यांचा निर्णय, असे म्हणत त्यावर अधिक बोलणे टाळले.
महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसची भूमिका - संभाजी राजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याचे पत्र पाठवले. यावर बोलताना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीची बैठक या विषयावर झाली नाही. ज्यावेळी तिन्ही पक्षांची चर्चा होईल, त्यावेळी बोलणे योग्य राहील. आज एका बाजूने बोलणे योग्य नाही.
संस्काराला गालबोट लागू नये - पुणे येथील स्मृती इराणी प्रकरण, राष्ट्रवादीकडून अंडे फेक आणि त्यानंतर भाजपकडून मारहाण. स्त्रियांचा सन्मान करा, हे आमचे संस्कार सांगतात. या संस्काराला कोणी गालबोट लावत असले तर त्याला माफी नाही, कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी, अशी भूमिका काँग्रेसने या प्रकरणावर मांडली.
काँग्रेसच्या विचारांचे संदेश देणारी टीम तयार करणार - सोशल मीडियाचे शिबीर होत आहे. चवन्नी छाप भाडोत्री लोक ठेवणार नाही. समाजाला वाचवणारी यंत्रणा उभारणी करायची आहे, असे नाना पटोले म्हणाले. भाजप सोशल मीडियावर 40 कोटी रुपये दररोज खर्च करून खालच्या पातळीवर जाऊन टीका करते. पण, काँग्रेस तसे करणार नाही. काँग्रेसच विचाराने उत्तर देण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या विचारांचे संदेश देणारी टीम उभी करायची आहे, असेही नाना पटोले म्हणाले. काँग्रेस निवडणुकांसाठी तयार आहे. ओबीसी आरक्षणासोबत निवडणुका व्हाव्यात यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - Strike Was Called Off : पगाराच्या आश्वासनानंतर बेस्टच्या कंत्राटी चालकांचा संप मागे