नागपूर - सध्या कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने इंजेक्शनचा काळाबाजार देखील होत आहे. हे थांबवण्यासाठी आणि रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवण्यासाठी आता सेवाग्राम एमआयडीसीतील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला रेमडेसिवीर तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या या इंजेक्शनची निर्मिती करण्यासाठी जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून अवघ्या दोन दिवसांत या कंपनीला परवानगी मिळाली. परवानगी मिळाल्याने आता लवकरच रेमडेसिवीरच उत्पादन सुरू होणार आहे.
दिवसाला 30 हजार रेमडेसिवीर उत्पादनाची क्षमता
नागपूर आणि विदर्भात असलेली रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेऊन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी रेमडेसिवीरची कमतरता भरून काढण्यासाठी अनेक महत्त्वाची पाऊले उचलली असून, चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वर्ध्याच्या 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला रेमडीसीवीरचे लायसन्स मिळवून दिले आहे. दिवसाला 30 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची या कंपनीची क्षमता आहे.
कंपनीत इतर आजारांवरील इंजेक्शनची देखील होते निर्मिती
वर्ध्यातील सेवाग्राम औद्योगिक वसाहतीमध्ये 2013 पासून या युनिटमध्ये जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीमार्फत सिटी स्कॅन, एमआरआय तसेच रुग्णालयात आवश्यक असलेले क्रिटीकल स्पेअर अप इंजेक्शन तयार करण्यात येत आहेत. डॉ, महेंद्र क्षीरसागर हे या कंपनीचे संचालक असून आता याच कंपनीमध्ये रेमडेसिवीरची निर्मिती होणार आहे.
हेही वाचा - 'भुजबळ नॉलेज सिटीने तयार केलेले कोविड सेंटर इतर संस्थांना प्रेरणादायी ठरेल'