नागपूर - शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोविड-१९च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड रुग्णालय बनले असून या संपूर्ण रुग्णालयात एकूण १८७६ बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालयांचे स्वतंत्र आदेश काढून या सर्व रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून मान्यता दिली आहे. या संपूर्ण रुग्णालयांमध्ये एकूण १८७६ एकूण बेड्सची उपलब्धता आहेत. यामध्ये २५६ बेडस् अतिदक्षता कक्षातील आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता असलेली ९९७ बेड्स आहेत तर ६२३ ऑक्सिजन नसलेले बेड्स आहेत. संपूर्ण रूग्णालय मिळून एकूण ९० व्हेन्टिलेटरची व्यवस्था आहे. ज्या १६ रुग्णालयांना 'कोविड रुग्णालये' म्हणून मान्यता मिळाली यामध्ये ऑरेंज सिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर (१५० बेड्स), सेव्हन स्टार हॉस्पीटल (१०५ बेड), श्री भवानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स ॲण्ड रिसर्च इंस्टिट्युट (११०बेड), गंगा केअर हॉस्पिटल्स (१०५ बेड) श्री राधाकृष्ण हॉस्पिटल्स ॲण्ड रिसर्च इंस्टिट्युट (१५० बेड ) लता मंगेशकर हॉस्पिटल्स (१५० बेड), कुणाल हॉस्पिटल्स (१००बेड), होप हॉस्पीटल (१०० बेड), सेंट्रल हॉस्पीटल (५० बेड), वोक्हार्ट हॉस्पीटल (४५ बेड ), रेडिअन्स हॉस्पीटल (६५ बेड), वोक्हार्ट हॉस्पीटल (११८ बेड), किंग्जवे हॉस्पिटल्स (२२८ बेड), अलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स (२०० बेड), न्यू एरा हॉस्पिटल्स (१०० बेड) आणि व्हिम्स हॉस्पिटल्स (१०० बेड) या रुग्णालयांचा समावेश आहे. ज्या हॉस्पिटल्सना आता नवे कोविड हॉस्पिटल्स म्हणून मान्यता देण्यात आली आहे
रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाप्रती काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात जो कोणी रुग्ण येईल तो जर अतिगंभीर असेल तर त्याला सर्वप्रथम उपचार देणे, आवश्यकता असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि त्या रुग्णाला स्टेबल करणे, हे त्या रुग्णालयाचे प्रथम कर्तव्य राहील. ज्या रुग्णांकडे थर्ड पार्टी विमा आहे, त्यांच्यावर उपचार करून क्लेमसाठी रुग्णालयानेच विमा कंपनींना पाठवावे. शासनाच्या परिपत्रकानुसार ८० टक्के बेड्स हे आरक्षित ठेवावे आणि त्यावर शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना हे बेड्स पूर्ण होईपर्यंत तेथेच दाखल करावे. त्यानंतरच २० टक्के बेड्स ज्यावर रुग्णालयाच्या दरानुसार बिल आकारता येईल, तेथे दाखल करावे, अशी नियम घालून देण्यात आले आहेत
केंद्रीय कॉल सेंटर सुद्धा कार्यान्वित करण्यात आले आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने कुठे जावे, कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, याबाबत रुग्णांमध्येच संभ्रम असतो. मात्र, नागपूर महानगरपालिकेने आता यापुढे ही व्यवस्था केंद्रीय पद्धतीने केली आहे. मनपात सध्या असलेल्या कोव्हिड कॉल सेंटरचा विस्तार करीत केंद्रीय कॉल सेंटर (Centralised Call Center) कार्यान्वित केले आहे. त्याचा क्रमांक ०७१२-२५६७०२१ असा आहे. जो रुग्ण पॉझिटिव्ह आला त्याने सर्वप्रथम संबंधित क्रमांकावर याबाबत माहिती द्यावी. तेथून त्यांनी होम आयसोलेशन अथवा रुग्णालयातील उपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. या कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयांमध्ये किती बेड उपलब्ध आहे, त्यांना कुठे भरती करु शकतो याबद्दल माहिती दिली जाणार आहे. या कॉल सेंटरची जबाबदारी मनपाचे डॉ. लाड व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्रीय कॉल सेंटरची पाहणी केली. या व्यवस्थेमुळे रुग्णांचा त्रास कमी होईल आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार कुठे घ्यायचा याविषयी निर्माण होणारा संभ्रम दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.