नागपूर - नक्षलवादी आणि माओवादी एकत्रितपणे २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान विलय सप्ताह साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी काही पत्रके जारी केली आहेत. (Communist Party of India Maoist 18th Anniversary) त्यामध्ये अग्नीवीर भरती आणि शेतकरी आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे नमूद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रकामध्ये शहरी नक्षलवाद वाढवणे आणि लोकांना सरकारच्या विरोधात लढण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अग्निवीर सैन्य भरतीत कसे भरती व्हायचे याची देखील त्यांनी योजना तयार केली असल्याचा खुलासा झाला आहे.




अधिकाधिक शहरांमध्ये आंदोलनांमध्ये सहभागी - भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवाद्यांचा १८ वा वर्धापन दिन (२१ ते २७ सप्टेंबर) या कालावधीत साजरा करणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आता शहरांमध्ये सक्रिय झालेला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नक्षलवाद आता हळूहळू शहरांमध्ये देखील पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोबतच येणाऱ्या दिवसांमध्ये अधिकाधिक शहरांमध्ये आंदोलनांमध्ये सहभागी व्हा आणि सरकारच्या विरोधात लोकांना एकजूट करा, अशी सगळी रणनीती त्यांनी आखली असल्याचे या २२ पानाच्या पत्रामुळे उघड झाले आहे.




नक्षली पत्र पोलिसांच्या हाती - हे पत्र नक्षलविरोधी विभागाच्या हाती लागलेले आहे. त्यामध्ये त्यांची काय रणनीती आहे पुढे काय योजना आहेत या सगळ्यांची माहिती उघड झाली आहे. अग्निविर भरतीवरही त्याचा डोळा आहे. ते आपले लोक यात घुसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस यंत्रणा पूर्णपणे सक्रिय असून, सगळ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. शहरी भागातही यंत्रणा सज्ज असून अग्निविर भरतीवरसुद्धा आमची बारीक नजर असल्याचे नक्षलवाद विरोधी पथकाचे महासंचालक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे