नागपूर - हिंसक आंदोलनासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला (Hindustani Bhau) नागपूर शहर पोलिसांनी नोटीस बजावली (Nagpur Police Notice) आहे. 22 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी नागपुरात हजर राहण्याचे आदेश नागपूर पोलिसांनी दिले आहेत. चौकशी दरम्यान गरज भासल्यास नागपूर पोलीससुद्धा हिंदुस्थानी भाऊला अटक करू शकतात. याच प्रकरणात हिंदुस्थानी भाऊला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, आता नागपूर पोलिसांनीसुद्धा नोटीस बजावली असल्याने हिंदुस्थानी भाऊच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
- काय आहे प्रकरण?
यावर्षीसुद्धा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा ऑनलाइन पद्धतीने भरल्या होत्या. त्यामुळे दहावी आणि बारावी वर्गाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात आली पाहिजे, या मागणीसाठी 31 जानेवारीला हजारो विद्यार्थानी राज्यातील विविध शहरांमध्ये आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची पोलिसांना तिळमात्र देखील कल्पना नव्हती. अचानक हजारो विद्यार्थी एकत्र येऊन आंदोलन करू लागले होते. याच दरम्यान नागपुरात काही विद्यार्थ्यांनी दगडफेक करून अनेक बसेसच्या काचा फोडल्या होत्या. विद्यार्थ्यांना हिंसक आंदोलन करण्यासाठी प्रेरित केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला अटक केली होती. नुकताच त्याला जामीन मंजूर झाला असला तरी हिंदुस्थानी भाऊ समोरील कायद्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. नागपूर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला नोटीस बजावला आहे.
- कोण आहे हिंदुस्थानी भाऊ?
विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ समाज माध्यमांवर सक्रिय आहे. टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्रामवर 'हिंदुस्थानी भाऊ' या नावाने प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 1.4 दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर फेसबुकवर 'हिंदुस्थानी भाऊ' या पेजवर 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.