नागपूर- एका धाब्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या ११ जुगारींना अटक केली आहे. त्यांच्या जवळील रोकड आणि चारचाकी वाहनांसह २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मनसर वर्धा हायवे आऊटर रिंग रोड वरील ग्रीन व्हॅली धाब्यावर एका खोलीमध्ये काही व्यक्तींनी जुगार अड्डा भरवला होता. ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट कमांक चारच्या पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी तेथे ११ जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या जुगार खेळणाऱ्याकडून ३२ हजारांची रोख रक्कम यासह १० मोबाईल आणि ५ चारचाकी वाहनांसह सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अलीकडील काळात नागपूर शहरामध्ये खुनाच्या व मालमत्तेच्या गुन्हयामध्ये वाढ झाली होती. त्यावर अंकूश लावण्यासाठी नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांनी संपुर्ण पोलीस विभागाला सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हेगार सापडल्यास त्यांच्या विरूध्द कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.