नागपूर - ऋषी खोसला हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आणखी ४ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या आधीच मुख्य आरोपी मिक्की बक्षी याला अटक केली असल्याने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ५ झाली आहे. दरम्यान, ऋषी खोसला यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघड झाले आहे. तर या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.
२२ ऑगस्टला कुलर व्यवसायी ऋषी खोसला या व्यावसायिकाची नागपूरच्या गोंडवाना चौकात निर्घृण हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण 'हाय-प्रोफाइल' असल्याने पोलिसांवर या खुनाचा उलगडा करण्याचा दबाव होता. यामुळे या घटनेच्या काही तासातच पोलिसांनी ऋषी खोसला हत्या प्रकरणात मुख्य आरोपी मिक्की बक्षी याला अटक केली. मात्र अन्य आरोपी पळून गेल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते.आरोपींचा शोध सुरु असताना ४ आरोपी, वाडी परिसरातील एका बौद्ध विहारात लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल कळमकर, कुणाल हेमणे, अरिफ इनायत खान आणि अझीझ अहमद यांचा समावेश आहे.
या प्रकरणात पाच आरोपी अटक झाल्यानंतर ऋषी खोसला यांच्या हत्येमागील कारणांचा उलगडा झालेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मिक्की बक्षी आणि ऋषी खोसला हे जुने मित्र होते. मिक्की आणि त्याच्या पत्नीमध्ये पटत नसल्याने ते दोघेही विभक्त राहात होते. दरम्यान, फारकत घेण्यासाठी त्यांनी न्यायालयात एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली असून त्या करिता ऋषी हा मिक्कीच्या पत्नीला मदत करात होता. शिवाय ऋषी आणि मिक्कीच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय मिक्कीला असल्याने तो गेल्या अनेक दिवसांपासून ऋषींचा काटा काढण्याच्या बेतात होता. २२ ऑगस्टच्या रात्री मिक्कीने भाडोत्री आरोपींच्या मदतीने ऋषीची हत्या घडवून आणली. मात्रा. त्याचा हा गुन्हा फार काळ लपू शकला नाही. आणि पोलिसांनी या मुख्य आरोपी मिक्की बक्षी याला अटक केली. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ५ झाली असून ऋषी खोसला यांची हत्या अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे.