नागपूर - 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नागपूरच्या मेट्रो रेलमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी उसळली होती. एकाच दिवशी तब्बल 56 हजार 406 नागपूरकरांनी मेट्रोमधून प्रवास केल्याने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले आहेत. महामेट्रोच्या ऑरेंज लाईन आणि ॲक्वा अशा दोन्ही मार्गांवर गर्दीचा उच्चांक झाला. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महामेट्रोने रात्री ९ वाजेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
यापूर्वी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची सर्वात जास्त राईडशीप 27 डिसेंबर 2020 रोजी झाली होती. त्यावेळी 22 हजार 123 प्रवाशांनी एकाच दिवशी मेट्रोने प्रवास केला होता. त्यानंतर आता 26 जानेवारी रोजी नवा रेकॉर्ड प्रस्थापित झालेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मेट्रोच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम
यापूर्वी मेट्रोमध्ये एवढी गर्दी कधीही झाली नव्हती, गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मेट्रोकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक मेट्रो स्टेशनवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये सुभाष नगर मेट्रो स्टेशनवर सीआरपीएफ कडून बँड पथकाने विशेष सादरीकरण केले, तर सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर देशभक्तीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा - ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारानंतर शेतकऱ्यांनी धरली घराची वाट