नागपूर - मूळच्या भंडारा जिल्ह्यातील तेजस्विनी ग्रुपच्या आठ महिलांनी शनिवारपासून ज्योतिर्मय यात्रेला (भारत परिक्रमा) सुरुवात केली आहे. या अंतर्गत आठ महिला २५ दिवसांमध्ये तब्बल ११ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. शनिवारी सकाळी देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपूरच्या झिरो-माईल येथे कांचन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून परिक्रमा यात्रेला सुरुवात केली.
11 हजार किमीची भारत भ्रमण यात्रा -
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याला ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने तेजस्विनी ग्रुपच्या आठ महिलांनी भारत भ्रमण करण्याचा निर्धार केला आहे. त्या भारत भ्रमण यात्रेत देशातील १३ राज्यातून सुमारे ११ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यामध्ये ९ ज्योतिर्लिंग, ७ नद्या आणि काही ऐतिहासिक स्थळांना त्या भेट देणार आहेत. तेजस्विनी ग्रुपच्या संयोजिका शुभांगी सुनील मेंढे यांच्या संकल्पनेतून ही भारत परिक्रमा आकाराला आली आहे.
यात्रेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश -
स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातील लोक, संस्कृती आणि वैभवशाली इतिहासाची माहिती करून घेण्याचा या परिक्रमेमागचा उद्देश आहे. यात्रेत सहभागी ८ महिलाच वाहन चालवत संपूर्ण यात्रा पूर्ण करणार आहेत. या माध्यमातून तेजस्विनी ग्रुप महिला सक्षमीकरणाचा संदेश देतील अशी माहिती शुभांगी मेंढे यांनी दिली आहे.