नागपूर - दिवाळी सण तोंडावर आहे. दिवाळी फराळ बनविण्याची लगबग सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. अनेक महिला उद्योजिकांकडून फराळ बनवून ते विकला जातो. मात्र नागपूरातील रससरिता गृह उद्योगाच्या फराळाला थेट अमेरिका, कॅनडासारख्या देशांतून मागणी येत आहे. शिवाय, भारतातील इतरही राज्यात या महिला गृह उद्योजिकांच्या दिवाळी फरळाला खवय्यांची पसंती मिळत आहे. त्यामुळे सध्या या गृह उद्योजिकांच्या फराळाची चांगलीच चर्चा आहे.
दिवाळीमध्ये अनेक फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी जय्यत तयारी देखील केली जाते. मात्र आजच्या धावपळीच्या काळात दिवाळीसाठी फराळ बनविणे प्रत्येकालाच शक्य होत नसल्याने तयार फराळाला बहुतांश लोक पसंती देतात. नागपूरातील महिला गृह उद्योजिकांकडून गेल्या ३५ वर्षांपासून दिवाळी फराळ बनविला जातो. या फराळाला भारतासह अमेरिकेसारख्या देशांतून दरवर्षी मागणी असते.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव; शेतकरी पुरता उदध्वस्त
यंदा कोरोनाचा संकट पाहता ही मागणी महिला गृह उद्योजिकांना अपेक्षित नव्हती. परंतु, कोरोनाच्या या परिस्थितीतही फराळाला तितकीच मागणी येत आहे. चिवडा, चकली, लाडू, अनारसे इत्यादी पदार्थांना विशेष मागणी येत आहे. या सगळ्या पदार्थांची वैशिष्ट्ये म्हणजे कमी तेलात हे पदार्थ तयार केले जातात. ज्यामुळे आरोग्य राखण्यास देखील मदत होते. शिवाय उत्कृष्ट चव यामुळे या महिला गृह उद्योजिकांना थेट विदेशी प्रवास गाठला आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात अनेक महिलांचा रोजगार गेला. या महिला गृह उद्योजिकांनी अशा अनेक महिलांना पुन्हा रोजगार उपलब्ध करून दिले. त्यामुळे आर्थिक गणित साधत त्यांनी माणुसकीही तितकीच जोपासल्याचे दिसून येते. या महिला जवळ जवळ १२ ते १३ प्रकारचे पदार्थ तयार करत आहेत. शिवाय, या सगळ्या पदार्थांचे दरही अगदी वाजवी असतात. त्यामुळे नागपूरकरही या गृह उद्योगाच्या पदार्थांना पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. या महिला गृह उद्योजिकांच्या कार्यातून अनेकांना वेगवेगळ्या मस्त पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. तर, दुसरीकडे रोजगार नसलेल्या महिलांना रोजगार मिळाल्यामुळे ही दिवाळी त्या महिलांसाठी खास ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनमुळे लोककलाकारांवर उपासमारीची वेळ, शासनाला मदतीची मागणी