नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुर शहरात आणि जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन आणि कर्फ्यु लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, नागपूरमध्ये लॉकडाऊन करण्याआधी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शंभर वेळा विचार करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. नागपूर शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण आणि वाढलेला मृत्युदर चिंतेचा विषय आहे. मात्र, लॉकडाऊन हा त्यावर पर्याय असू शकत नसल्याचे मत महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - शिवाजी महाराजांचा आदरच, मात्र.... घोषणा वादावर व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया
लॉकडाऊन सामान्य नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडणारा ठरेल. त्यामुळे लॉकडाऊन घोषित करताना शंभर वेळा विचार करावा, असे महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे. ३१ जुलैपर्यंत नागरिकांना स्वतःमध्ये बदल करून नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करू. तरीही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. तर १ ऑगस्टनंतर लॉकडाऊनचा विचार करू, असे देखील संदीप जोशी म्हणाले आहेत.
नागपूर शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे ही सत्यस्थिती आहे. त्यातील ३० टक्के रुग्ण ग्रामीण परिसरातील आहेत. तीन वेळा लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या वाढतच आहे. म्हणजेच लॉकडाऊन केला अथवा कर्फ्यु लावला म्हणजे रुग्णसंख्या कमी होईल, हे १०० टक्के खरे नाही. कोरोनावर विजय मिळविण्यासाठी लॉकडाऊन हा १०० टक्के उपाय नाही नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - कामगाराच्या मेहनतीला फळ; खाणीत सापडला 50 लाखांचा हिरा
लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पुन्हा लॉकडाऊन झाले तर त्यांच्यावर बिकट वेळ येईल, त्यामुळे आजपासून ३१ तारखेपर्यंत आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधिंसोबत रस्त्यावर उतरून जनजागृती करण्यावर भर दिला पाहिजे. लॉकडाऊन लावणे दोन मिनिटांचे काम आहे. मात्र,त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती भयंकर असेल. ही परिस्थिती टाळण्यासाठी एकत्रित आणि संघटितपणे कोरोना विरुद्धचा लढा देण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना केले आहे.