नागपूर - आज बोलले जाते, की भारतात येत्या काही वर्षांत जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक युवक असतील. यामुळे ज्या देशाकडे युवा शक्ती असेल त्याच देशाचे भविष्य असेल, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) 66व्या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
नागपूरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 66व्या दोन दिवसीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाले. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मारक समिती स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात या अधिवेशनाला सुरुवात झाली. या समारोहाला देशभरातून आलेले राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. तसेच ऑनलाईन माध्यमातून विविध प्रांतातून जवळपास 4 हजार स्क्रीनच्या माध्यमातून दीड लाख लोकांनी या कार्यक्रमात सहभात घेतला.
दुर्बलता हीच भारताची ताकद..
सामान्य माणसाची शक्ती एकवटली तर देश मोठा होतो. भारताची ताकद म्हणजे येथील दुर्बल सामान्य व्यक्तींची शक्ती आहे. सामान्य माणसाचे सामर्थ्य वाढत गेले की त्याची शक्ती वाढत जाते. आपला देश विश्वगुरु होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे. सामान्य माणसाने भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी देशासोबत उभे राहावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
महामारीत भारतीयांनी परिचय दिला घडवून..
कोरोना महामारीच्या काळात ज्या पद्धतीने भारत देशाने समाना केला. तो इतर देशांना दिसला नाही. भारत असा एकमेव देश आहे. ज्याने आपल्या सामाजिक जबाबदारीचा परिचय करून दिला. जीवनाकडे बघण्याची दृष्टी आपली श्रेष्ठ असून आपली मूल्य ही आपली शक्ती आहे, असे ते यावेळी म्हणाले.
युवा पिढीला इतर देशाचे आकर्षण..
आपल्या युवापिढीला अमेरिका-चीन बनण्याचे वेध लागले आहे. पण आपल्या देशातील युवकानी भारताला बनवायचे आहे. भारत ही एक सकारात्मक शक्ती आहे. ही शक्ती दुसर्यावर अन्याय करण्यासाठी नसून दुर्बलांचे रक्षण करणारी आहे.
भारताने आत्मनिर्भर झाले पाहिजे..
आपल्याला दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन चालायचे नाही. भारत कधीच कुणासमोर झुकणार नाही. भारताने सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर झाले पाहिजे. आपल्या देशाला विश्वगुरू बनण्याचे ध्येय असून त्यावर विश्वास असला पाहिजे। सामान्य माणसाचा मनात हा विश्वास निर्माण झाला तरच आपले स्वप्न पूर्ण होईल असेही भैय्याजी जोशी यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले.
एबीव्हीपीसाठी अभिमानाची बाब..
देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अस्तित्वात येत आहे. शिक्षणाचे भारतीयकरण व्हावे स्वदेशीचा विचार व्हावा, शिक्षण ओझं वाटू नये, याकरिता विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मागील अनेक वर्षांपासून मागणी करत होते. तेव्हा ती मागणी आता पुर्ण होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे परिषदेसाठी ही अभिमानाची बाब आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. छगन भाई पटेल यावेळी म्हणाले.
यावेळी या कार्यक्रमाला अभाविपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. छगन भाई पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी, स्वागत समिती अध्यक्ष डॉ. संजीव चौधरी, स्वागत समिती उपाध्यक्ष रितू चानेकर, प्रदेशाध्यक्ष प्रो. योगेश येनारकर यांची उपस्थिती होती. यावेळी देशभरातील कार्यकारणी सदस्य दिल्ली छत्रसाल, जेएनयू दिल्ली, आग्रा, जयपूर, बिकानेर, नवसारी, भोपाल, सोलापूर, त्रिपुरा, ओरिसा, यासह सुमारे चार हजार स्थानावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अधिवेशनात ऑनलाइन सहभाग नोंदवला.
हेही वाचा : पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार