नागपूर - माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर कुख्यात गुंड म्हणून जो आरोप केला तो चुकीचा आहे, असे म्हणत नवाब मालिकांचा हायड्रोजन बॉम्ब नसून त्यातून फक्त धुव्वाच निघालाय आवाजही झाला नाही, असा टोला माजी बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव यांनी लगावला. ते नागपुरात ईटीव्ही भारताशी बोलत होते. नवाब मलिक याचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्यांना अटक होणार या भीतीतून त्यांनी हे आरोप केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या विरोधात कोर्टात एक रुपयाचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही मुन्ना यादव म्हणाले.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू आहे. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मालिके यांचे संबंध हे अंडरवर्ल्डशी असून त्यांच्या कुटुंबीयांनी टाडाच्या आरोपातील गुन्हेगारांकडून कवडीमोल भावात जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असा इशारा दिला होता. यातच नवाब मलिक यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव हे कुख्यात गुंड असून त्यांना बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्षपद दिल्याचा आरोप केला. मुन्ना यादव हे अनेक वर्षे नगरसेवक राहिले आहेत. त्यांची पत्नी लक्ष्मी या नगरसेविका आहेत.
नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या बहिणीच्या ड्रायव्हरची जमीन घेतली. त्यामुळे यांची चौकशी होणार आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात गेले तीच वेळ आपल्यावर येईल, अशी भीती मलिकांना आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने माझं नाव गोवत राजकीय आरोपासाठी याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केल्याचे ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव म्हणाले.
त्यांची लायकीप्रमाणे 1 रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार -
अल्पसंख्याक मंत्री नावब मलिक हेच गुंड आहेत आणि अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे ते भीती आणि रागापोटी असे आरोप करत आहेत. त्यांची रुपयाची लायकी असल्याने त्यांच्यावर पक्षातील वरिष्ठ मंडळी आणि वकिलांशी सल्ला घेऊन येत्या दोन-तीन दिवसात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे यादव म्हणाले.