नागपूर - माझी वसुंधरा अभियान दिनांक २ ऑक्टोंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवण्याचे शासनाचे आदेश आहेत. या अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याच्या अनुषंगाने तसेच अभियानाच्या जनजागृतीसाठी आज नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी नागपूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सायकलने कार्यालयात पोहोचले.
आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी सायकल घेऊन आकाशवाणी चौकात उपस्थित होते. त्यानंतर आकाशवाणी चौकातून सर्व कर्मचारी सायकलने सिव्हील लाईन्स कार्यालयात आले. यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हरित शपथ घेतली. मनपाच्या सर्व झोनमधील अधिकारी देखील कार्यालयामध्ये सायकलनेच आले होते.
प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने उपक्रमात सहभागी व्हावे
नागपुरात वायु प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी सायकलचा वापर करावा. नागरिक सायकलचा वापर करत आहेत. त्याचा चांगला परिणाम देखील दिसून येत आहे. यापुढेही दर महिन्यात किमान एक दिवस मनपाचे अधिकारी व कर्मचारी सायकलने कार्यालयात येतील अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे.