नागपूर - अपक्ष खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणे शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना महागात पडण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपूर्वी नागपुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वाट्याला जाणाऱ्यांना 20 फूट खोल खड्ड्यात गाडण्यासाठी धमकी दिली होती. याविरुद्ध नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी देणे आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.
नवनीत राणा यांच्या स्वाक्षरीसह लेखी तक्रार युवा स्वाभिमानच्या कार्यकत्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोपवली आहे. संजय राऊत यांनी मातोश्रीशी छेडछाड करू नका अन्यथा 20 फूट खाली गाडले जाल, असे वक्तव्य नागपुरातील एका पत्रकार परिषदेत केली होती. संजय राऊत यांच्या त्याच वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात भा.दं.वी.चे कलम 153 (अ), 294, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा स्वाभिमानने केली आहे. आता नागपूर पोलीस या संदर्भात काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे नजरा लागल्या आहेत.
हेही वाचा - Sanjay Raut : मातोश्रीशी छेडछाड करू नका, २० फूट खाली गाडले जाल : संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला इशारा